निर्मल सुजल योजनेचे काम १५ दिवसात पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:49+5:302021-02-23T04:28:49+5:30

पातूर : दिनांक २० जानेवारी २०२१ला झालेल्या पातूर नगर परिषदेच्या सभेत निर्मल सुजल योजनेच्या विषयाला नगर परिषद मुख्याधिकारी तथा ...

Complete Nirmal Sujal Yojana in 15 days! | निर्मल सुजल योजनेचे काम १५ दिवसात पूर्ण करा!

निर्मल सुजल योजनेचे काम १५ दिवसात पूर्ण करा!

Next

पातूर : दिनांक २० जानेवारी २०२१ला झालेल्या पातूर नगर परिषदेच्या सभेत निर्मल सुजल योजनेच्या विषयाला नगर परिषद मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षांनी बगल दिल्याचा आराेप करत येत्या १५ दिवसात निर्मल सुजल योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी पातूर नगर परिषदेच्या नगरसेविका वर्षा संजय बगाडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी सोनाली यादव व नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांना दिले आहे.

पातूर शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने पातूर नगर परिषदेला ११ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याला ९ वर्षे उलटूनही ही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा गंभीर विषय नगर परिषदेच्या २० जानेवारी रोजी आयाेजित सभेत घेण्याची गरज होती; मात्र या विषयाला बगल देऊन योजनेच्या ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचा आरोप बगाडे यांनी आपल्या निवेदनातून केला आहे. निर्मल सुजल योजनेचे काम अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यासाठी योजनेचे काम करणारा ठेकेदार मुदतवाढ मागत आहे. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देतानाच प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड पातूर नगर परिषद प्रशासनाने ठोठावला आहे. या दंडाची रक्कम आज रोजी दीड कोटींच्या जवळपास असून, यातील एक रुपयाही ठेकेदाराने पातूर नगर परिषदेकडे भरणा केलेला नाही. या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या योजनेच्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून तथा दंडाची दीड कोटींची रक्कम वसूल करून या योजनेचे उर्वरित काम दुसऱ्या कंत्राटदाराला देऊन योजना पूर्ण करावी, अशी मागणीही बगाडे यांनी निवेदनातून केली आहे.

.................

अन्यथा न्यायालयात दाद मागणार!

शासनाद्वारे पातूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ११ कोटींचा निधी देऊन ९ वर्ष झाले. मात्र, या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. या गंभीर विषयाला नगर परिषदेच्या २० जानेवारीच्या सभेत बगल देण्यात आली. आता १५ दिवसात ही योजना पूर्ण न झाल्यास याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही नगरसेविका वर्षा बगाडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Complete Nirmal Sujal Yojana in 15 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.