पंचनामे पूर्ण ; तूर खरेदीच्या ठिकाणी लावले ‘सीसी कॅमेरे’

By admin | Published: April 28, 2017 01:58 AM2017-04-28T01:58:32+5:302017-04-28T01:58:32+5:30

अकोला : जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे गुरुवारी पूर्ण करण्यात आले असून, तूर खरेदीच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’देखील लावण्यात आले आहेत.

Complete the panchnama; 'CC Cameras' put in place for purchase of tur | पंचनामे पूर्ण ; तूर खरेदीच्या ठिकाणी लावले ‘सीसी कॅमेरे’

पंचनामे पूर्ण ; तूर खरेदीच्या ठिकाणी लावले ‘सीसी कॅमेरे’

Next

अकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील तुरीचे पंचनामे गुरुवारी पूर्ण करण्यात आले असून, तूर खरेदीच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’देखील लावण्यात आले आहेत.
हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून मोजमापाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील १ लाख ७ हजार ९७ क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले होते. नाफेडद्वारे हमीदराने तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने तूर कुठे विकणार, याबाबतचा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर तूर खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. यासंबंधीचा आदेश २६ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनामार्फत प्राप्त झाला.
त्यानुसार जिल्ह्यातील नाफेडद्वारे तूर खरेदीच्या पाचही खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारीच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रांवर तुरीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केंद्रावर तहसीलदार राजेश्वर हांडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांच्यासह तालुका उपनिबंधक, बाजार समिती सचिव, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत संयुक्तरीत्या तुरीचे पंचनामे करण्यात आले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार तूर खरेदी केंद्राच्या परिसरात मोजमापाच्या ठिकाणी ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात आले.

Web Title: Complete the panchnama; 'CC Cameras' put in place for purchase of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.