प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:21+5:302021-09-19T04:20:21+5:30
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ...
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ओमप्रकाश उपाख्य बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ६ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमधून उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केेंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी इत्यादी पदांवर पदोन्नती देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत २००९ पासून राबविण्यात आली नसल्याने, प्राथमिक शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने भरावयाची शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि विषय शिक्षकांची जवळपास २०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे २०२१ मधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेपूर्वी २०१८च्या मंजूर बिंदुनामावलीनुसार प्रलंबित असलेली प्राथमिक शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे ४ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत प्रलंबित असलेली प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ६ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०२१ मधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यापूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.
मंगेश टिकार, जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना.