‘सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:51+5:302021-06-17T04:13:51+5:30
...... बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग! अकोला : पावसाळा सुरू झाला असून, खरीप हंगामातील पेरण्यांची तयारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू ...
......
बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग!
अकोला : पावसाळा सुरू झाला असून, खरीप हंगामातील पेरण्यांची तयारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे, तसेच पेरणीसाठी शेती मशागतीच्या कामांनाही जिल्ह्यात वेग आल्याचे चित्र आहे.
......
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना!
अकोला : महसूलविषयक अकोला उपविभागातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सोमवारी अकोला तहसील कार्यालयांंच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रकरणांचीही त्यांनी माहिती घेतली.
............................................................
दंड वसुलीच्या कारवाईची घेतली माहिती
अकोला : जिल्ह्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतुकीसंदर्भात जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी संतोष शिंदे यांनी मंगळवारी घेतली. तहसील कार्यालयांच्या संबंधित नायब तहसीलदारांकडून त्यांनी यासंदर्भात माहिती घेतली.
........................................................
सिंधी कॅम्प येथे जीमवर कारवाई
अकोला : दक्षिण झाेनमधील हिराबाई प्लॉट, सिंधी कॅम्प येथील डीजे स्टुडिओ जीम रहिवासी भागात असून, जीम बंद करण्यासंदर्भात नागरिकांची तक्रार होती. त्या अनुषंगाने मनपाच्या दक्षिण झाेन अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संचालकांकडे जीम चालविण्यासंबंधी कोणतीही परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे मंगळवारी मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये सदर जीमवर बाजार विभाग व अतिक्रमण विभागाद्वारे सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
------
भाजी बाजारात उसळली गर्दी
अकाेला : काेराेना विषाणूमुळे बाधित रुग्णांची संख्या कमी हाेत असून, शासनाने सर्व प्रकारची दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, जठारपेठ चाैकातील भाजी बाजारात ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याचे दिसून येत आहे. नियमांचे पालन न करताच नागरिक भाजीपाला व इतर साहित्याची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.
-----
प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा!
अकोला : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. राज्य शासनाने घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. सध्या खरीप हंगामाची पेरणी जवळ आली असल्याने शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे.
----
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
------
वाडेगाव परिसरात अवैध वृक्षतोड
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात आडजात वृक्षांची विनापरवाना कत्तल होत आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर तस्करांकडून कुऱ्हाड चालविली जात आहे.
--------
विनामास्क आढळून आल्यास कारवाई
अकोला : दुचाकीवर विनामास्क आढळून आल्यास शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
----------
जिल्ह्यातील रोहयोंतर्गतची कामे अपूर्ण
अकोला : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची अनेक कामे अर्धवट आहेत. मजुरांना कामे उपलब्ध व्हावीत, म्हणून अर्धवट असलेली कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.
------
क्षयरुग्णांची नोंदणी करण्यास गती द्या
अकोला : खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहित नमुन्यातील माहिती व नोंदणी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची गती वाढवावी, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
-----------------------------------
बार्शिटाकळी तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा सुरू
बार्शिटाकळी : शहरात गुटखा विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. असे असतानादेखील बार्शिटाकळीत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
---
पीक कर्जाचे वाटप संंथ गतीनेे
अकोला : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही जिल्ह्यातील परिसरातील बँकांत पीक कर्ज वाटपाचा वेग संथ आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------
टाकळी खुरेशी परिसरात पेरणीला वेग
खिरपुरी : परिसरात गत चार दिवसांत दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला वेग दिला असून, ढगाळी वातावरण कायम असल्याने काही शेतकरी मात्र सावधगिरी बाळगत असल्याचे दिसत आहे. पाऊस थांबल्याने पेरण्या रखडल्या आहेत.