सहा महिन्यात सातव्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:04+5:302021-03-23T04:20:04+5:30
अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या शाळा पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा बिकट ...
अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या शाळा पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा बिकट स्थितीमध्ये मोबाईलद्वारे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. यामध्ये अवघ्या सहा महिन्यात इयत्ता सातव्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हारीस खान फिरोज खान या विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडून कौतुक करण्यात आले आहे.
महापालिकेच्या ३३ शाळांमध्ये शहरातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुणी व हुशार विद्यार्थी आहेत. आज रोजी त्यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे शिक्षणाचे धड़े दिले जात आहेत. महानगरपालिकेच्या मनपा उर्दु शाळा क्र. ९मध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या हारीस खान फिरोज खान याने त्याचे वडील व खासगी शिकवणी संचालक फिरोज यांच्या मार्गदर्शनात सातव्या वर्गाचे संपूर्ण शिक्षण ६ महिन्यात पूर्ण केले. याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रधानमंत्री कार्यालयातून
हारीस खान फिरोज खान या चिमुकल्या विद्यार्थ्याला
शिक्षणाच्या चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडूनही शुभेच्छा संदेश प्राप्त झाला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले कौतुक
मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने कोरोनाच्या कालावधीत अवघ्या सहा महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा तसेच स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी पुष्पगुच्छ देऊन हारीस खान फिरोज खान या विद्यार्थ्याचे कौतुक केले.