अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ८५१ महिला शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण

By Atul.jaiswal | Published: February 12, 2024 06:39 PM2024-02-12T18:39:12+5:302024-02-12T18:46:07+5:30

प्रशिक्षणार्थी कोमल शंकर कदम रोल यांनी परेड कमांडर आणि प्रशिक्षणार्थी मुक्ता भिमराज आव्हाड यांनी सेकंड इन परेड कमांडर म्हणून संचलनाचे नेतृत्व केले.

Completed training of 851 women constables from Akola Police Training Centre | अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ८५१ महिला शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ८५१ महिला शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण

अतुल जयस्वाल, अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या सत्र क्रमांक ६४ मधील ८५१ महिला प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने दीक्षांत संचलन समारंभाद्वारे त्यांना पुढील सेवेत रूजू होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. सर्वप्रथम पोलीस अधिक्षकांना मानवंदना देण्यात आली. त्यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींनी शिस्तबद्ध कवायत संचलन सादर केले. प्रशिक्षणार्थी कोमल शंकर कदम रोल यांनी परेड कमांडर आणि प्रशिक्षणार्थी मुक्ता भिमराज आव्हाड यांनी सेकंड इन परेड कमांडर म्हणून संचलनाचे नेतृत्व केले.

पोलीस अधिक्षकांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, प्राप्त केलेल्या ज्ञानाचा पुर्णपणे वापर करुन नागरिकांना सेवा द्यावी. आदर्श माणूस व आदर्श पोलीस म्हणुन नावलौकिक मिळवावा. कायद्याचे अद्ययावत ज्ञान तसेच सीसीटीएनएस प्रणालीचे ज्ञान आत्मसात करून त्याचा आपल्या कामकाजात अचूक वापर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई येथील पोलीस उपायुक्त व तत्कालीन प्राचार्य दत्तात्रय कांबळे यांनी आपल्या अहवाल वाचन केले. ते म्हणाले की, सन १९७० साली प्रशिक्षण केंद्र स्थापन झाल्यापासून एकुण २६ हजार ८७२ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. आताच्या तुकडीच्या अंतिम परीक्षेचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. प्रशिक्षण केंद्रात राबविण्यात येणारे उपक्रम व पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांची त्यांनी माहिती दिली.

अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन सर्वप्रथम आलेल्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी काजल सोपान वाक्षे यांच्यासह आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणात व गोळीबार, परेडमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्राचे प्राचार्य अभय डोंगरे, उपप्राचार्य कैलास जयकर, राखीव पोलीस निरीक्षक विनोद तांबे, सत्र संचालक, पोलीस निरीक्षक, उदय सोयस्कर, प्रमुख लिपीक, सचिन भाऊराव सांगळे व मंत्रालयीन कर्मचारी यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राखीव पोलीस निरीक्षक विनोद उत्तमराव तांबे यांनी आभार मानले.

Web Title: Completed training of 851 women constables from Akola Police Training Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला