‘दृष्टी गणेशा’च्या माध्यमातून केला अवयव दानाचा संकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:18 PM2019-09-09T12:18:21+5:302019-09-09T12:18:29+5:30
कोल्हापूर येथील पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्वदेखील दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनने स्वीकारले.
अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे ‘दृष्टी गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी लालबागच्या राजा चरणी नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प करण्यात आला. शिवाय, कोल्हापूर येथील पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्वदेखील दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनने स्वीकारले.
गत पाच वर्षांपासून दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये ‘दृष्टी गणेशा’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी माळीपुरा एकता गणेशोत्सव मंडळ येथे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी दृष्टी गणेशा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट अभिनेते प्रफुल्ल वाडेकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, कैलास रणपिसे, राजेश चंदनबटवे, प्रा. विशाल कोरडे, दिव्यांग आर्ट गॅलरीचे गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, जान्हवी राठोड, श्रीकांत तळोकार, प्रा. नितीन सातव, विजय देशमुख, साथ फाउंडेशनचे मिलिंद धोत्रे व सौरभ वाघोडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात गणेशगीतांचे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चित्रपट अभिनेते प्रफुल्ल वाडेकर यांच्यासह नीलेश देव व धनश्री अभ्यंकर यांनी अवयव दानाचा संकल्प केला.
पूरग्रस्तांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप
दृष्टी गणेशा या उपक्रमांतर्गत दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनतर्फे पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. यांतर्गत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.