नियाेजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:20+5:302020-12-27T04:14:20+5:30
अकोला: शहरातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे, बेशिस्त पार्किंग, दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण ...
अकोला: शहरातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक परिसरात खड्डेच खड्डे, बेशिस्त पार्किंग, दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आगार प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने शहरातील बसस्थानक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे. नव्या बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नसल्याने जुन्या बसस्थानकात घाण पसरली आहे. नवीन बसस्थानकातही दुर्गंधी असून, कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो. बसस्थानक आवारालगतच ऑटो व काही खासगी वाहने उभी राहत असल्याने बसस्थानकात बस आणण्यासाठी चालकाला कसरत करावी लागते, तसेच बसस्थानक आवारात खुलेआम लघुशंका केल्या जात असल्याने दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाणी पिण्याच्या टाकीजवळही घाणीचे साम्राज्य असल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचा जीव धोक्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छता करण्यात आली होती; मात्र स्थिती ''जैसे थे'' आहे. बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडले असल्याने खड्डे पडले आहेत. बसस्थानक परिसरात पार्किंगची समस्या असून, काही प्रवासी आपल्या दुचाक्या रस्त्यावरच पार्किंग करीत असल्याने एसटीबसला बसस्थानकात ये-जा करताना चालक-वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाैचालये आहेत, पण बंद अवस्थेत!
शहरातील नवीन बसस्थानकात शौचालयाची व्यवस्था आहे; मात्र या शौचालयात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जुन्या बसस्थानक परिसरात शौचालये आहेत; मात्र ते बंद अवस्थेत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना होत आहे. शौचालयात घाण असल्याने काही प्रवासी शौचालयात जाणे टाळतात. परिणामी, काही प्रवासी बसस्थानकाच्या आवारातच लघुशंका करीत असल्याचे चित्र आहे.
माेकाट जनावरांचा प्रवाशांना नाहक त्रास
बसस्थानकात मोकाट गुरांचा ठिय्या असल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे एसटी प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. मोकाट गुरांच्या वास्तव्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आगर प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकात समस्या निर्माण झाल्या आहेत. येथील पाण्याच्या टाकीजवळ घाण असल्याने प्रवाशांना तसेच दूषित पाणी प्यावे लागते. परिणामी, आरोग्य धोक्यात सापडले आहे.
- संतोष बोराखडे, प्रवासी.
बसस्थानकात शौचालयात साफसफाई नसल्याने मोठी अडचण निर्माण होते, तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाल्याने महिलांसह चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
- कुसूम सोळंके,
महिला प्रवासी