ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारली, मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:05+5:302021-07-04T04:14:05+5:30
जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे बरे ...
जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही बाब अकोलेकरांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात मागील सात दिवसांत दोघांचा मृत्यू, तर ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुकानिहाय रुग्णांच्या आकड्यांचा विचार केल्यास दोन्ही मृत्यू हे अकोला तालुक्यातील आहे. सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्ण हे बार्शिटाकळी तालुक्यात केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी त्या तुलनेने महापालिका क्षेत्रातील चिंता कायम आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कमी दिसून येईल.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मृत्यू - तालुका - रुग्ण
० - अकोट - ०७
० - बाळापूर - ०४
० - मूर्तिजापूर - ०७
० - बार्शिटाकळी - ०३
० - तेल्हारा - ०४
२ - अकोला - २१ (ग्रामीण -०६, मनपा-१५)
सात दिवसांत ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही
जिल्ह्यातील कोविडची रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आली असून, मृत्यूचा वाढता आकडाही नियंत्रणात येत आहे. मागील सात दिवसांत ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला असून, ते मनपा क्षेत्रातील असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात येत आहे, मात्र कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. नागरिकांनी यापुढेही आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, नियमित हात धुणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला