कीटकनाशकांचा वापर करताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती मोहीम राबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:38+5:302021-08-20T04:23:38+5:30
अकोला : जिल्ह्यात पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधेच्या घटना होऊ नयेत, ...
अकोला : जिल्ह्यात पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधेच्या घटना होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात कीटकनाशकाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
कीटकनाशक वापराबाबत जिल्हा व तालुका स्तरावर जनजागृती करून, कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधा झाल्यास त्याबाबतचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करण्याच्या सूचनाही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे औषधे व वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कीटकशास्त्र विभागाचे डॉ. डी. बी. उंदिरीवाडे व डॉ. कुळकर्णी यांनी कीटकनाशक वापरासंबंधी मार्गदर्शन केले.