अकोल्यात दोन गटांत संघर्ष; एकाचा मृत्यू; जुन्या शहरात संचारबंदी; तणावपूर्ण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 06:15 AM2023-05-15T06:15:07+5:302023-05-15T06:16:17+5:30
रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले.
अकोला : सोशल मीडियावरील पोस्टवरून जुन्या शहरात दोन गटात संघर्षाचा भडका उडून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. जुने शहर भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, तणावपूर्ण शांतता आहे.
रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, नागपूर पोलिस उपायुक्त राकेश कलासागर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. संचारबंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद होती, तसेच रस्त्यांवर शुकशुकाट हाेता.
शनिवारी रात्री काही वस्त्यांमध्ये असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून जाळपोळ केली. ८ ते ९ घरांची नासधूस करीत, १५ दुचाकी जाळल्या. तसेच ९ चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहनमालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिली.
मृताच्या नातेवाइकांना ४ लाख
मृताच्या नातेवाईकांना राज्य शासनामार्फत ४ लाखांची मदत मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केली.
३०० जणांवर गुन्हे, ३० जणांना अटक
पोलिसांनी दगडफेक, हाणामारी, जाळपोळ प्रकरणात दोन्ही गटातील ३०० ते ३५० असामाजिक तत्त्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, शनिवार रात्रभरापासून ते दुपारपर्यंत पोलिसांनी ३० जणांना अटक केली असल्याचे ठाणेदार वानखडे यांनी सांगितले.