ड्रेसकोडबाबत संभ्रम, आदेश आले नसल्याने अंमलबजावणी नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:42+5:302020-12-16T04:34:42+5:30
निहिदा : सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात अथवा बाहेर ड्रेसकोडमध्ये राहण्याचे आदेश शासनाने ८ डिसेंबर रोजी ...
निहिदा : सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात अथवा बाहेर ड्रेसकोडमध्ये राहण्याचे आदेश शासनाने ८ डिसेंबर रोजी दिले आहेत. परंतु बार्शीटाकळी तालुक्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये ड्रेसकोडबाबत संभ्रम आहे. आदेशच प्राप्त न झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ड्रेसकोडची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
अनेक जबाबदार अधिकाऱ्यांकडून अद्याप वरिष्ठांकडून आदेश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाने ड्रेसकोडबाबत आदेश काढल्यानंतरही बार्शीटाकळी तालुक्यात एकाही विभागाचे अधिकारी, कर्मचारी पालन करताना दिसत नाहीत. शासनाने ८ डिसेंबर रोजी दिलेल्यात आदेशात अधिकारी, कर्मचारी यांचा दैनंदिन पोशाख हा शासकीय कर्मचाऱ्यास शोभनीय व व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, सलवार, चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता, शर्ट किंवा दुपट्टा असा पोशाखा बंधनकारक आहे, तर पुरुष कर्मचाऱ्यासाठी शर्ट, पेंट, ट्राउझर पेंट असा पोशाख आहे. दर शुक्रवारी खादी कपडे परिधान करावे, असे परिपत्रक शासनाने काढले आहे. परंतु बार्शीटाकळी तालुक्यातील एकाही कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, ड्रेसकोडमध्ये पहावयास मिळत नाहीत. सर्वजण चित्रविचित्र, रंगीबेरंगी, टी, शर्ट, आदी ड्रेसकोड मध्येच दिसून येतात. याबाबत गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ड्रेसकोडबाबत शासनाने आदेश काढले, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अद्यापही कोणतेही आदेश मिळाले नाहीत. वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर ड्रेसकोडचे पालन करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.