मनपाच्या पाेटनिवडणुकीचा संभ्रम; इच्छुकांकडून ‘लाॅबिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:46+5:302020-12-09T04:14:46+5:30
२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागांची पुनर्रचना केली असता, एकूण २० प्रभाग अस्तित्वात आले. एका प्रभागात चार ...
२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागांची पुनर्रचना केली असता, एकूण २० प्रभाग अस्तित्वात आले. एका प्रभागात चार यानुसार ८० सदस्य (नगरसेवक) निवडून आले. प्रभागांचे वाढलेले भाैगाेलिक क्षेत्रफळ, लाेकसंख्येची घनता आदी बाबी पाहता नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याच्या उद्देशातून प्रभागांचे अ, ब, क व ड असे वर्गीकरण करण्यात आले. नगरसेवकांनीसुध्दा साेयीनुसार आपआपल्या भागातील विकास कामांवर लक्ष केंद्रित केले. अशा स्थितीत काेराेनाच्या कालावधीत शहरातील दाेन नगरसेविका आणि एका नगरसेवकाचे झालेले निधन मनाला चटका लावून गेले. प्रभाग क्रमांक ३ मधील वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्या ॲड. धनश्री देव, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपचे नगरसेवक संताेष शेगाेकार व प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपच्या नगरसेविका नंदाताई पाटील यांचे निधन झाल्यामुळे सदस्य पद रिक्त झाले. यासंदर्भातील अहवाल मनपाच्या नगर सचिव विभागाने राज्य निवडणूक आयाेगाकडे सादर केल्यामुळे शहरात पाेटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
निवडणुकीवर संभ्रम
आगामी वर्षातील सप्टेंबर महिन्यांत अकाेला, बुलडाणा व वाशिम या तीन स्थानिक स्वराज्य संस्थेची (विधान परिषद) निवडणूक हाेऊ घातली आहे. त्यानंतर लगेच नाेव्हेंबरमध्ये नगर परिषद, नगर पालिकांची निवडणूक हाेइल. फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. वर्तमानस्थितीत काेराेनाचा प्रादुर्भाव व राज्याच्या तिजाेरीवर आलेला बाेजा लक्षात घेता पाेटनिवडणुकीवर संभ्रम दिसून येताे.
तीन सदस्य पद रिक्त झाल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयाेगाकडे सादर केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक वर्षाचा शिल्लक असलेला कालावधी लक्षात घेता निवडणूक आयाेगाच्या निर्देशाकडे लक्ष लागले आहे.
- संजय कापडणीस, आयुक्त मनपा