महिला व बालकल्याणच्या सभेचाही गोंधळ
By admin | Published: July 4, 2017 02:43 AM2017-07-04T02:43:27+5:302017-07-04T02:43:27+5:30
अकोला : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाकडून समितीच्या सभेच्या नोटिसाही सदस्यांना मिळाल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाकडून समितीच्या सभेच्या नोटिसाही सदस्यांना मिळाल्या नाहीत. तरीही सभेला उपस्थित झालेल्या सदस्यांना गेल्या सभेतील कामकाजाचे इतिवृत्तही देण्यात आले नाही, या प्रकारामुळे संतप्त सदस्यांनी महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत सभा तहकूब केली. ती सभा ७ जुलै रोजी होणार आहे.
महिला व बालकल्याण समिती सभेच्या नोटिसा संबंधित सदस्यांना मिळत नसल्याची तक्रार खुद्द सभापती देवकाबाई दिनकरराव पातोंड यांनी २३ जून रोजीच महिला व बालकल्याण अधिकारी सोनकुसरे यांच्याकडे दिली आहे. तरीही ३ जुलै रोजीच्या सभेच्या नोटिसा सदस्यांना पोचल्याच नाहीत. सभापतींचे स्वीय सहायक पुंडकर यांनी केलेल्या दूरध्वनीनुसार सदस्य उपस्थित झाले. त्यामुळे सदस्य आणखीच संतप्त झाले. सभेची नोटिसही दिली जात नाही, इतिवृत्तही मिळत नाही, तर सभेला कशाला यायचे, असा संतप्त सवाल त्यांनी सभापतींसह सोनकुसरे यांना केला. हा प्रकार सातत्याने घडत असल्याचेही त्यांनी सभेत सांगितले. काही कामकाज होत असेल, तरच सदस्यांना किंमत आहे; अन्यथा बोलावूच नका, असा पवित्राही सदस्यांनी घेतला. त्यामुळे महिला व बालकल्याण अधिकारी सोनकुसरे चांगलेच अडचणीत आले. सभापती पातोंड यांनी बाजू सावरत तहकूब सभा ७ जुलै रोजी घेण्याचे सांगितले.
सर्वसाधारण सभेलाही सोनकुसरे यांची दांडी
जिल्हा परिषदेच्या १४ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेला महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांनी दांडी मारली होती. त्यावेळी प्रशासकीय शिस्त म्हणून त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साधी विचारणाही न केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे ऐनवेळी सभेत सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी सोनकुसरे यांच्यावर कारवाईसाठी नोटिस बजावण्याचे निर्देश दिले. त्याबाबतची माहिती मोबाइलद्वारे देण्याची तसदीही त्यांनी घेतलेली नाही. ते स्पष्टीकरण ग्राह्य धरण्याबाबत आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात, यावरच कारवाई अवलंबून आहे.