पडीक वाॅर्ड बंद करण्यावर संभ्रम; कर्मचाऱ्यांना आदेश नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:43+5:302021-05-06T04:19:43+5:30
अकाेला : शहरातील पडीक वाॅर्डाची संकल्पना १ मे पासून बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त निमा अराेरा घेणार होत्या. त्यासाठी ...
अकाेला : शहरातील पडीक वाॅर्डाची संकल्पना १ मे पासून बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त निमा अराेरा घेणार होत्या. त्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांचे उपलब्ध संख्याबळ लक्षात घेता कामाची जबाबदारी साेपविण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी आराेग्य निरीक्षकांना दिले होते; परंतु यासंदर्भात आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना आदेश मिळाले नसल्याची माहिती असून, कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, तसेच नाल्या व सर्व्हिस लाइनमध्ये दैनंदिन साफसफाई केली जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जाताे. स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४२ पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. यांच्या वेतनापाेटी मनपाकडून वर्षाकाठी २१ काेटी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे पडीक वाॅर्डात खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाकडून वर्षाकाठी ५ काेटी ६० लक्ष रुपये अदा केले जातात. अर्थात वेतन व देयकापाेटी २७ काेटी रुपये खर्च केल्यानंतरही शहरात सर्वत्र पसरलेली घाण, धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या व सर्व्हिस लाइनचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. ही बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी स्वच्छतेच्या मुद्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
बंदचा आदेश नाही; देयके थकीत
महापालिका आयुक्त निमा अरोरा यांनी पडीक वाॅर्ड बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणताही लेखी आदेश काढला नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे सदर वाॅर्ड बंद होणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच पडीक वाॅर्डची देयके थकीत ठेवण्यात आली आहेत, हे येथे उल्लेखनीय. यामुळे कंत्राटदार बुचकळ्यात पडले असून, त्यांनी सत्ताधारी भाजपमधील पदाधिकाऱ्यांकडे धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पदावर कुटुंबातील काेणत्याही एका सदस्याची नियुक्ती केली जाते. पत्नीला सेवेत रुजू करून घेतल्यानंतर कालांतराने राजीनामा देऊन मुलाला सेवेत घेण्यात येते. यामुळे मध्यंतरीच्या काळात पुरुषांच्या बराेबरीत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने महिलांची संख्या वाढली. त्यामुळे नाइलाजाने महिला कर्मचाऱ्यांनाही नाला सफाईची जबाबदारी साेपविली जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात महिला कर्मचारी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.