‘लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणावर संभ्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:35 PM2020-04-03T12:35:03+5:302020-04-03T12:35:12+5:30
लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावर शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात जाहीर करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ आणि राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति महा प्रति सदस्य ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने ३१ मार्च रोजी घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींव्यतिरिक्त इतर शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरणाचा निर्णय शासनामार्फत अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावरून राज्यातील शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत गरिबांची उपासमार होऊ नये तसेच कोणताही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत लाभार्थी कुटुंबातील प्रति सदस्य प्रति महा ५ किलो मोफत धान्य वितरित करण्याचा आदेश केंद्र शासनमार्फत राज्य शासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबातील प्रत् िसदस्य प्रति महा ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ३१ मार्च रोजी घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त तीन महिन्यांच्या कालावधीत प्रति सदस्य प्रति महा ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येणार असले तरी, राज्यातील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी व इतर केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत तांदूळ वितरण करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मध्ये मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावर शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना धान्य मिळणार?
‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर राज्यातील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थीं कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रति महा ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला; मात्र ज्या गरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबांना मोफत धान्य वितरणाचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांना मोफत धान्य मिळणार की नाही, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.