जिल्हा परिषद पदभरतीसाठी परीक्षेच्या मुद्यांवरही गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:00 PM2019-07-15T12:00:45+5:302019-07-15T12:00:50+5:30
महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला.
अकोला: जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या आॅनलाइन परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी असताना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी त्या पटीने शुल्क भरावे लागले. आता उमेदवारांना एका पदासाठी किती ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देता येईल, याबाबत महापरीक्षा पोर्टलकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने उमेदवारांचा संताप होत आहे.
महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. त्यामुळे ३५ जिल्हा परिषदांतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला पोर्टलने उमेदवारांना दिला. त्यामुळे एकाच पदासाठी ३५ जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करण्याची संधी असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी १७ हजार तर आरक्षित प्रवर्गासाठी १२,५०० रुपये परीक्षा शुल्क भरले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेतील रिक्त पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झाल्यास उमेदवारांना किती ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल, याबाबतची माहिती महापरीक्षा पोर्टलकडून दिली जात नाही. तसेच परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दलही उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. येत्या आॅगस्टमध्ये परीक्षा होण्याची शक्यता असताना महापोर्टलकडून उमेदवारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा प्रकार अनेकांसोबत घडत आहे. विशेष म्हणजे, एका पदासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार असताना उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देण्याची संधी आहे. त्यामुळे उमेदवारांकडून केवळ शुल्काची रक्कम वसूल करण्यासाठी पसंतीक्रमाचा पर्याय देण्याऐवजी स्वतंत्र अर्ज करण्याचा अट्टहास महापरीक्षा पोर्टलने केला.
बेरोजगारांची आर्थिक पिळवणूक
राज्यात प्रत्येक पदासाठीचे वेळापत्रक सारखेच असले तरी उमेदवारांना ३५ जिल्हा परिषदांतील एकाच संवर्गाच्या पदासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्ला महापरीक्षा पोर्टलच्या मेसेजद्वारे दिला. प्रत्येक पदासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेचा स्वतंत्र अर्ज केल्यास खुल्या प्रवर्गाला प्रतिअर्ज ५०० रुपये, तर राखीव गटातील उमेदवारांकडून ३५० रुपये शुल्क आकारले. त्यातून राज्यातील बेरोजगारांची आर्थिक पिळवणूकही झाली आहे.