शाळा सुरू करण्यावर संभ्रम; शिक्षण विभागाचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:14 AM2020-06-21T10:14:01+5:302020-06-21T10:14:24+5:30
नेमके नियोजन कसे राहील, यासंदर्भात मनपाच्या शिक्षण विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटात येत्या २६ जूनपासून महापालिकेच्या शाळा सुरू करण्याचा चेंडू जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्तांकडे टोलविला असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मुद्यावर मनपा प्रशासन संभ्रमात आहे. शाळांमधील उपलब्ध सोयी-सुविधा लक्षात घेता २६ जूनपासून शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवल्या जाणार, आॅनलाइन पद्धत अमलात आणल्यास त्याचे नेमके नियोजन कसे राहील, यासंदर्भात मनपाच्या शिक्षण विभागाचा चांगलाच कस लागणार आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून, जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता संपूर्ण शहर रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. अशा स्थितीत यंदाचे शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला.
सद्यस्थितीत शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने संबंधित परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित केला जात आहे. अशा स्थितीत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपाच्या स्तरावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस कशा पद्धतीने नियोजन करतात, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
एकच शाळा सुरू होईल!
शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता नववी ते दहावी व बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे. यादरम्यान, वर्ग खोल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल. विद्यार्थ्यांची पटसंख्या ध्यानात घेऊन एका वर्ग खोलीचे दोन वर्ग करावे लागतील. तसेच सम-विषमनुसार वर्ग उघडावे लागतील. अर्थात, या निकषानुसार एकमेव मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये इयत्ता नववीचा वर्ग सुरू करता येईल. परंतु इयत्ता पहिली ते सातवी सॅनिटायजर कराव्या लागतील
सोशल डिस्टंस ठेवण्याचे निर्देश, इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी जुलै पासून, अशी एकच शाळा आहे. उर्वरित ३२ शाळांचा प्रश्न कायम,अशावेळी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संपर्क व संवाद साधावा लागेल, शाळा सुरू होईपर्यंत, पुस्तके घरपोच द्यावे लागतील, घरी अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे लागेल, चिमुकल्यांना आॅनलाईन शक्यच नाही.
...तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवा!
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रणालीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत; परंतु मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता किती विद्यार्थी अत्याधुनिक मोबाइलद्वारे आॅनलाइन शिक्षण घेऊ शकतील, यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीत आॅनलाइन शक्य नसेल तर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकविण्याचे शिक्षकांना निर्देश आहेत. शिवाय यापैकी किती विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण प्रणाली समजू शकणार, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
सर्व शाळा रेड झोनमध्ये!
आजरोजी शहराच्या प्रत्येक भागातून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरात मनपाच्या एकूण ३३ शाळा असून, त्यांचा रेड झोनमध्ये समावेश होतो.
रेड झोनमधील शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून स्पष्ट निर्देश प्राप्त नसल्यामुळे जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन संभ्रमात आहे.