सभापती पदांसाठी सदस्यांची मनधरणी!
By admin | Published: July 7, 2016 02:18 AM2016-07-07T02:18:07+5:302016-07-07T02:18:07+5:30
अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १३ जुलै रोजी.
अकोला: जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांसाठी १३ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर महाआघाडी आणि सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये सदस्यांच्या बैठका घेऊन, आवश्यक असलेले संख्याबळ जुळविण्यासाठी सदस्यांची मनधरणी केली जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गत आठवड्यात निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि आरोग्य व अर्थ इत्यादी चारही विद्यमान सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी १२ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या चार नवीन सभापतींची निवड १३ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. सभापती पदांची निवडणूक सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, जिल्हा परिषदेतील राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये सत्ताधारी भारिप-बमसं आणि शिवसेना-भाजप, काँग्रेस मिळून तयार झालेल्या महाआघाडीच्या नेत्यांकडून सदस्यांच्या बैठका घेऊन चर्चा केली जात आहे. त्यामध्ये सभापती पदांच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी सदस्यांची मनधरणी केली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सभापती पदांच्या निवडणुकीत महाआघाडीची मोट बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये महाआघाडीत सहभागी पक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक गत सोमवारी घेण्यात आली असून, सभापती पदांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. तर भारिप-बमसं स्थानिक नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्यांची बैठकदेखील मंगळवारी पार पडली. त्यामध्ये सभापती पदांच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या सदस्यांच्या संख्याबळाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. एक अपक्ष सदस्यासह अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या सदस्यांसोबतही भारिप-बमसंकडून चर्चा केली जात आहे.