काँग्रेस आघाडीचे गु-हाळ सुरूच !
By admin | Published: January 31, 2017 02:11 AM2017-01-31T02:11:44+5:302017-01-31T02:11:44+5:30
आज काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक; अकोल्यातील काँग्रेसकार्यकर्त्यांना घोषणेची प्रतीक्षा.
अकोला, दि. ३0- महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेसोबत दोन हात करण्याची तयारी चालवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सन्मानजनक आघाडीचे संकेत दिल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या हालचालींनी वेग घेतला. सोमवारी मुंबईत आघाडीच्या मुद्यावर दोन्ही पक्षांत चर्चेच्या फैरी झडल्या; मात्र ठोस निर्णय होऊ शकला नाही.
महापालिकेत साडेसात वर्षे सत्तापदाची धुरा सांभाळल्यानंतर अकोलेकरांनी मागील अडीच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकांवर बसवले. मनपासह केंद्र व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या कालावधीत शहरातील विकास कामे ठप्प पडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. निवडणुकीच्या कालावधीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्या तरी सत्ताधार्यांची बाजू लक्षात घेता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दोन्ही पक्षांतील नेते, वरिष्ठ पदाधिकार्यांमध्ये मुंबईत २७ जानेवारी रोजी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीने ४८ जागांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांकडून प्राप्त प्रस्तावांवर संबंधित नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू असून जागा वाटप कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीदेखील आघाडीचा तिढा सुटू शकला नाही.
आघाडीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. उद्या मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील. सन्मानजनक आघाडी व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मुस्लीमबहुल प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही आहोत.
- बबनराव चौधरी,
शहर अध्यक्ष, काँग्रेस
जागा वाटपाच्या संदर्भात आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला असून आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
-विजय देशमुख,
जिल्हाध्यक्ष राकाँ.