पक्ष निधीवरून कॉँग्रेसमध्ये नाराजी!
By admin | Published: November 6, 2014 12:50 AM2014-11-06T00:50:47+5:302014-11-06T00:50:47+5:30
अकोल्यातील स्थानिक काँग्रेस पदाधिका-यांचा दावा.
अकोला: कॉँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी निवडणुकीत अनेक उमेदवारांना पैसे (पक्षनिधी) व अन्य रसद पोहोचली नसल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता निवडणुकीत जिल्ह्यातील कॉँग्रेस उमेदवारांना पक्षनिधी अल्प प्रमाणात मिळाल्याची बाब समोर आली आहे. पक्षनिधीवरून जिल्ह्यात नाराजी पसरली असून, अल्पनिधीचा परिणाम प्रचारावर झाला होता, असा दावाही आता पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून होत आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. सर्वात जास्त रस्सीखेच अकोला पश्चिम मतदारसंघात झाली होती. अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमधील एका गटाने ह्यपॅनलह्ण तयार केले होते. या पॅनलमधील सदस्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र पॅनलमधील सदस्याला उमेदवारी मिळाली नाही. दरम्यान, निवडणुकीत जागा वाटपावरून क ॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघातून उमेदवार उभे केले. अकोला पश्चिम मतदारसंघातून उषा विरक, मूर्तिजापूर मतदारसंघातून श्रावण इंगळे, आकोटमधून महेश गणगणे, बाळापूरमधून सैय्यद नातिकोउद्दिन खतीब आणि अकोला पूर्वमधून डॉ. सुभाष कोरपे यांनी निवडणूक लढविली. ऐन प्रचाराच्या काळात कॉँग्रेसमध्ये निलंबन आणि राजीमान्याचे नाट्य रंगले . १0 पेक्षा आजी-माजी पदाधिकार्यांवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्यांनी राजीनामे दिले होते. जिल्ह्यात कॉँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण वगळता राज्यातील अन्य नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. निवडणुकीत कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता कॉँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू झाले. निवडणुकीत उमेदवारांना देण्यात येणार्या पक्षनिधीवरून आरोपास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना अल्प निधी मिळाला होता. याबाबत अकोला पूर्वमधून निवडणूक लढविलेले डॉ. सुभाष कोरपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षनिधीबाबत बोलण्यास नकार दिला.