काँग्रेसची भारिपला आघाडीची ‘ऑफर’!
By admin | Published: October 25, 2016 02:55 AM2016-10-25T02:55:20+5:302016-10-25T02:55:20+5:30
प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव
खामगाव, दि. २४- खामगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी भारिपचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.
खामगाव नगर परिषदेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा मतदार संघदेखील सतत १५ वर्षे काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जात होता; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने काँग्रेसच्या या गडाला खिंडार पाडली आहे. दरम्यान, नगर परिषदेमधील काँग्रेसची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि त्यांचे बंधू अशोकसिंह सानंदा यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. नगर परिषदेच्या सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी इतर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचे संकेत माजी आमदार सानंदा यांनी यापूर्वीच दिले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाची आघाडी होणार असल्याची चर्चा शहरात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसने इतर पक्षांसोबतच भारिपसोबत युती करुन स्पष्ट बहुमत मिळविले. हेच समीकरण नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही राबविण्यात येवून भाराकाँ व भारिप युतीने अनेक ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. आता पुन्हा एकदा भारिप-काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे. भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर रविवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. खामगाव येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत माजी आमदार सानंदा यांनी भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव अँड.आंबेडकरांसमोर ठेवला आहे. भाजप-शिवसेना वगळता समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत आंबेडकरांनीसुद्धा भारिपच्या पदाधिकार्यांना हिरवी झेंडी दिली असल्याची माहिती आहे.
खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत याबाबत चर्चा सुध्दा झाली आहे. मंगळवारी याबाबत अँड.आंबेडकर यांच्यासोबत पुन्हा चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
- अशोक सोनोने
जिल्हाध्यक्ष भारिप-बमसं