काॅंग्रेस राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 06:57 PM2020-11-07T18:57:20+5:302020-11-07T18:59:24+5:30
Prakash Ambedkar News राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.
अकाेला: वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरुध्द बनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे, बनकर हे राजकीय प्रलाेभनाला बळी पडले असून, या दाेघांचेही राजकारण शॉर्ट टाइम टर्मचे आहे आणि काॅंग्रेस, राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज पडते, असा टाेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हाणला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीने राज्यात सक्षम पयार्य उभा केला आहे. ही चळवळ बांधताना अनेक नेत्यांना घडविले. महाराष्ट्रासमाेर उभे केले. त्यांनी लाखालाखांच्या सभा घेतल्या; पण ते वंचितला साेडून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीला काही फरक पडत नाही. भगदाड तर मुळीच नाही. जे वंचितमध्ये असताना लाखांची सभा घेत हाेत ते दुसऱ्या पक्षात गेल्यावर कुचकामी ठरल्याचीच उदाहरणे आहेत. अशी मंडळी राजकीय प्रलाेभनाला बळी पडतात. त्यांचे राजकारणच मुळी शाॅर्ट टाइम टर्मसाठी असते. ती टर्म संपली की ते संपतात. अशी उदाहरणे आहेत, त्यामध्येच भिंगे, बनकर यांची गणती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.