महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला सुरुंग; निधीचे ‘चाॅकलेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:20 AM2021-01-03T04:20:18+5:302021-01-03T04:20:18+5:30
सूर्य उगवला म्हणजे ताे मावळणारच या उक्तीनुसार महापालिकेत आजवर एकतर्फी निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य शासनाने ठराव रद्द करून ...
सूर्य उगवला म्हणजे ताे मावळणारच या उक्तीनुसार महापालिकेत आजवर एकतर्फी निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य शासनाने ठराव रद्द करून जागेवर आणले असले तरीही भाजपने निधी वाटपाचे ‘चाॅकलेट’ देत विराेधी पक्षांनाच सुरूंग लावल्याचे समाेर आले आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान, नागरी दलित वस्ती सुधार याेजनेसह इतरही मनपा निधीतून भरीव मदत करण्याचे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्याची खेळी सत्तापक्षाने केली आहे. सेनेचे काही नगरसेवकही भाजप पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
राज्यात २०१४ मध्ये युती सरकारच्या कालावधीत महापाैरपद भाजपच्या तर उपमहापाैरपद सेनेच्या वाट्याला आले. परंतु या दरम्यान शहरातील विकासकामांचे निर्णय असाे वा राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून विकासकामांचे भूमिपूजन असाे या दाेन्ही विषयांपासून भाजपने सेनेचे लाेकप्रतिनीधी, पदाधिकारी व नगरसेवकांना बाजूला सारले. मनातली ही खदखद २०१९ मधील लाेकसभा निवडणुकीच्या सभेत शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी जाहीरपणे बाेलून व्यक्त केली हाेती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात माेठा फेरबदल हाेऊन शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत घराेबा केल्याचा परिणाम मनपाच्या राजकारणावर झाल्याचे दिसून येत आहे. गत काही महिन्यांपासून सत्तापक्षाच्या निर्णयाविराेधात राष्ट्रवादीचे नगरसेवक वगळता सेना, काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच भविष्यात प्रभाग रचनेमुळे शहरात राजकीय उलथापालथ हाेणार हे गृहीत धरून भाजपने निधी वाटपाच्या माध्यमातून विराेधकांनाच सुरूंग लावल्याचे समाेर आले आहे.
विराेधी पक्षातील नगरसेवक संपर्कात
मनपाची २०२२मध्ये निवडणूक हाेइल. त्यापूर्वी प्रभाग रचना हाेऊन वॉर्ड उदयास येतील. एका वॉर्डात एक किंवा दाेन सदस्य निवडणूक लढतील. ही रचना भाजपसाठी अनुकूल नसल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे आतापासूनच भाजपने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांना विकासकामांच्या बाबतीत ‘ऑफर’ दिल्याची माहिती आहे.
एमआयएमला खतपाणी
मनपात काँग्रेसचे १३ नगरसेवक असून यापैकी १२ नगरसेवक उत्तर झाेनमधून निवडून आले आहेत. यापैकी एक नगरसेवक जुने शहरातील प्रभाग १७ मध्ये आहे. काँग्रेसला पाेषक ठरणाऱ्या प्रभागात एमआयएमला खतपाणी घालण्याचे काम काही राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे बाेलले जात आहे.