अकोल्यात काँग्रेस-राकाँ ‘फिफ्टी-फिफ्टी’कडे!

By admin | Published: January 29, 2017 02:25 AM2017-01-29T02:25:08+5:302017-01-29T02:25:54+5:30

निर्णयार्थ चेंडू प्रदेशाध्यक्षांकडे आज पुन्हा बैठक .

Congress-NCP's 'Fifty-Fifty' in Akola! | अकोल्यात काँग्रेस-राकाँ ‘फिफ्टी-फिफ्टी’कडे!

अकोल्यात काँग्रेस-राकाँ ‘फिफ्टी-फिफ्टी’कडे!

Next

अकोला, दि. २८- जागा वाटपासंदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची भूमिका बघता, 'फिफ्टी-फिफ्टी'कडे वाटचाल सुरू झाल्याची खात्रिलायक माहिती आहे. महापालिकेच्या निवडणुकीत थोरल्या भावाच्या भूमिकेत वावरणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस ४८ जागांचा प्रस्ताव दिला होता. यापैकी चार जागांचा तिढा सुटला असून, चार जागांवर दोन्ही पक्षांत खलबते सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून जागा वाटपाच्या निर्णयार्थ चेंडू प्रदेशाध्यक्षांकडे सोपविण्यात आल्याची माहिती असून, रविवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेनेनंतर शहरात सर्वाधिक राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत. ही सुरुवात इतर पक्षाच्या तब्बल दहा नगरसेवकांना गळाला लावण्यापासून झाली. त्यापाठोपाठ माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीमधील अंतर्गत घडामोडींनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास उंचावल्याचे चित्र आहे. यादरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी राज्यांतील दहा महापालिकांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा करताच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालींनी वेग घेतला. २७ जानेवारी रोजी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पदाधिकार्‍यांची जागा वाटपाच्या मुद्यावर बैठक पार पडली असता, राष्ट्रवादीकडून काँग्रेससमोर ४८ जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बैठकीच्या पहिल्या दिवशी जागा वाटपावर एकमत न झाल्यामुळे शनिवारी बैठकीच्या दुसर्‍या फेरीला सुरुवात झाली.
यावेळी ४८ पैकी चार जागांचा तिढा सोडविण्यात आला असून, चार जागांवर दोन्ही पक्षांत खलबते सुरू होती. बैठकीला राकाँचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष अजय तापडिया, सैयद युसूफ अली, विश्‍वनाथ कांबळे, प्रा. सरफराज खान, तसेच काँग्रेसकडून वझाहद मिर्जा, प्रदेश महासचिव मदन भरगड, शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार. नातिकोद्दीन खतीब, साजीद खान पठाण, मधुकर कांबळे, अब्दुल जब्बार, महेश गणगणे व कपिल रावदेव आदी उपस्थित होते.

'फिफ्टी-फिफ्टी'पेक्षा कमी नाही!
राकाँने दिलेल्या ४८ जागांच्या प्रस्तावापैकी चार जागांचा तिढा सुटला, तर चार जागांवर एकमत न झाल्याची माहिती आहे. अर्थात राष्ट्रवादीकडून ४४ जागा लढविल्या जाण्याची चिन्हे आहेत. साहजिकच यावेळी प्रथमच काँग्रेसला अध्र्या जागांवर समाधान मानावे लागेल, असे चित्र दिसून येत आहे. दोन्ही पक्षांची वाटचाल पाहता, ह्यफिफ्टी-फिफ्टीह्ण जागांवर एकमत होण्याची शक्यता आहे.

जागा वाटपातील आकड्यांपेक्षा आम्हाला निवडणुकीत जिंकणे महत्त्वाचे वाटते. आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. राकाँच्यावतीने जागा वाटपाचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला असून, त्यांच्याकडूनच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
-विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

दोन्ही पक्षांनी एकमेकांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली; परंतु बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. जागा वाटपासंदर्भात पुढील निर्णय विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे घेतील.
-बबनराव चौधरी,  शहर अध्यक्ष काँग्रेस.

Web Title: Congress-NCP's 'Fifty-Fifty' in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.