काँग्रेसचा बालेकिल्ला झाला भाजपचा गड

By admin | Published: May 17, 2014 12:04 AM2014-05-17T00:04:58+5:302014-05-17T19:21:41+5:30

भाजपच्या मतात ८ टक्क्यांनी वाढ, काँग्रेसचाही टक्का वाढला तर भारिपचा घटला

Congress's fortress got BJP's fortress | काँग्रेसचा बालेकिल्ला झाला भाजपचा गड

काँग्रेसचा बालेकिल्ला झाला भाजपचा गड

Next

अकोला : स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघाला १९८९ साली भाजपने खिंडार पाडले. तेव्हापासून तर आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आला नसून, अकोला आता भाजपचा गड झाला आहे. भाजपचे संजय धोत्रे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली असून, २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपची मते आठ टक्क्यांनी वाढली असून, भारिपची मते सहा टक्क्यांनी घटली आहेत.
१९५२ पासून १९८९ पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी होत होता. मात्र, १९८९ मध्ये भाजपचे पांडुरंग फुंडकर या मतदारसंघात विजयी झाले व तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. १९९८ व १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी विजय मिळविला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारिपने काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यानंतर मात्र, २००४ साली काँग्रेस व भारिप वेगवेगळ्या निवडणुका लढले. तसेच भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार असलेले संजय धोत्रे यांनी उमेदवारी दिली. संजय धोत्रे यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे यांचा १ लाख ६० हजार ७४ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. यावेळी संजय धोत्रे यांना ३१३३२३ मते मिळाली होती तर लक्ष्मणराव तायडे यांना २०६९५२ मते, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना १८७२०२ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस दुसर्‍या तर भारिप तिसर्‍या क्रमांकावर होती. त्यानंतर झालेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपचे संजय धोत्रे यांनी ६४ हजार ८४८ मतांनी विजय मिळविला. यावेळी त्यांनी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला तर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत संजय धोत्रे यांना २८७५२६ मते, प्रकाश आंबेडकर यांना २२२६७८ मते तर बाबासाहेब धाबेकर यांना १८२७७६ मते मिळाली होती. या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ३८.९१ टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यामध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली असून, धोत्रे यांना ४६.९४ टक्के मते मिळाली आहेत.

Web Title: Congress's fortress got BJP's fortress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.