मध्य प्रदेशातील शुटरचे टोळी युद्धातील आरोपींशी ‘कनेक्शन’
By admin | Published: June 27, 2014 01:32 AM2014-06-27T01:32:45+5:302014-06-27T01:34:03+5:30
आकोट फैल परिसरात घडलेल्या टोळी युद्धातील आरोपींशी संबंध असल्याची माहिती
अकोला- मध्य प्रदेशातील कुख्यात आरोपी, शुटर वसीम खान अहेसान खानचे आकोट फैल परिसरात घडलेल्या टोळी युद्धातील आरोपींशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. टोळी युद्धात पिस्टलचा वापर करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. वसीमला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा गडंकी रोडवर अटक केली होती. आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते.
गुन्हेगारी जगतावर वर्चस्व अबाधित राहण्यासाठी आकोट फैल परिसरात २00८ मध्ये दोन टोळ्यांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला होता. या वेळी एकाची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी २0१0 मध्ये पुन्हा सशस्त्र संघर्ष झाला. या दोन्ही गुन्ह्यात २५ पेक्षा जास्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्याकांडातील सात आरोपींविरुद्ध मकोका अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे गांजा, ब्राऊन शुगर यासारख्या अवैध धद्यांमध्ये गुंतले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम खानला मध्य प्रदेशातून टोळी युद्धातील आरोपींनीच अकोल्यात आणले होते. वसीमच्या मदतीने मध्य प्रदेशातून गांजा, ब्राऊस शुगर अकोल्यात आणल्या जात होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वसीमची कसून चौकशी करीत आहेत