भूजल चार्जिंगसाठी ‘ओव्हरफ्लो’ पाण्याचे संवर्धन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:06 PM2019-11-04T13:06:44+5:302019-11-04T13:06:49+5:30
पावसाच्या पाण्याचा भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते.
- संजय खांडेकर
अकोला : क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा झाल्याने राज्यातील जवळपास सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. ओव्हरफ्लो पाण्याचे संवर्धन करीत भूजल चार्जिंगचे राज्यात प्रयोग राबविले गेले पाहिजे, अशी मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पीएमओ कार्यालयाकडे एका निवेदनातून केली आहे.
यावर्षी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र व सीमावर्तीय राज्याची धरणे भरली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त जलसाठा धरणांत येत असल्याने विसर्ग केल्या जात आहे. त्यामुळे पाण्याचे लोंढे नदीत आणि नदीतून समुद्रात जाऊन मिसळत आहेत. त्यामुळे गोड पाण्याची नासाडी होत आहे. याच पावसाच्या पाण्याचा जर भूजल चार्जिंगसाठी उपयोग केला गेला तर पाण्याची पातळी वाढविली जाऊ शकते, अशा आशयाचे निवेदन पीएमओ कार्यालयास पाठविण्यात आले आहे.
‘ओव्हरफ्लो’ होत असलेल्या पाण्याचे भूजल चार्जिंग केले गेले तर आगामी वर्षात येणाऱ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी सक्षम स्थिती तयार होईल. पुढील वर्षी पाऊस कमी पडला तरी शेतकऱ्यांवर दुष्काळाची वेळ येणार नाही. भूजल पुनर्भरणासाठी शासनाने पुढाकार घेऊन योजना आखाव्यात. धरणापासून एक किलोमीटर अंतरावर नदीच्या पात्राजवळ ठिकठिकाणी खोल छिद्र करून पाणी जिरविले पाहिजे. त्यामुळे जल पातळीत वाढ होईल. भारतासारख्या पाण्याची तूट असलेल्या देशासाठी पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा एक उत्तम प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि उपाययोजना राबवावी, अशी मागणीदेखील ‘कॅट’ने केली आहे.