प्रलंबित समित्या गठित करा!
By admin | Published: March 20, 2017 02:41 AM2017-03-20T02:41:37+5:302017-03-20T02:41:37+5:30
पालकमंत्र्यांचे निर्देश; अधिका-यांची घेतली बैठक
अकोला, दि. १९- शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रलंबित जिल्हास्तरीय समित्या तातडीने गठित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांच्या आढावा बैठकीत दिले.
विविध योजना आणि विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या विभागांतर्गत शासकीय अधिकारी आणि अशासकीय पदाधिकारी-सदस्यांच्या जिल्हास्तरीय समित्यांचे गठन झाले की नाही, प्रलंबित असलेल्या समित्या गठित का झाल्या नाहीत आणि समित्या गठित करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला; तसेच विभागनिहाय जिल्हास्तरीय विविध समित्यांच्या रचनांची माहिती सादर करून, प्रलंबित असलेल्या जिल्हास्तरीय समित्या तातडीने गठित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्यांना दिले. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह समाजकल्याण, कामगार कल्याण, वन विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समित्यांचे गठन प्रलंबित का राहिले?
जिल्ह्यात काही विभागांतर्गत अद्याप जिल्हास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या नाहीत. त्यानुषंगाने समित्यांचे गठन करण्याची प्रक्रिया प्रलंबित का राहिली, यासंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना यावेळी विचारणा केली. प्रलंबित असलेल्या समित्यांचे गठन तातडीने करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले.