प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे!
By admin | Published: September 6, 2016 02:30 AM2016-09-06T02:30:18+5:302016-09-06T02:30:18+5:30
आयोग सुचविणार दुरुस्त्या; राजकीय पक्ष मात्र अस्वस्थ झाले आहेत.
अकोला, दि. ५: राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला. सदर आराखडा मंगळवारी निवडणूक आयोगाक डे सादर केला जाईल. त्यानुषंगाने पालिकेचे कर्मचारी सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग रचने तील फेरबदलाचा राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला असून, काही पक्षांत अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.
यंदा महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार पार पडेल. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त चार नगरसेवकांचा एक याप्रमाणे प्रभाग तयार होतील. सर्व प्रभागांत चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील, अशी रचना करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. प्राथमिक स्तरावर प्रभागाची पुनर्रचना करण्याचे काम महापालिकेने करायचे असून, आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सो पविली आहे. मनपाने तयार केलेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या २0 झाली असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रगणकांनी तयार केलेल्या गटातील लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे. मनपाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाईल. त्यानुसार सोमवारी मनपाचे कर्मचारी आराखडा घेऊन मुंबईकडे रवाना झाले.
निवडणूक आयोगाकडून या आराखड्यात बदल करून दुरुस्त्या सुचविल्या जाणार आहेत.