अकोला जिल्ह्यात लोकसहभागातून ३५०० वनराई बंधारे बांधणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:47 AM2019-11-18T10:47:29+5:302019-11-18T10:47:35+5:30
लोकसहभागातून ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधून वाहते पाणी थांबवून, पाणी पातळी वाढविण्यासह रब्बी हंगामात शेतीच्या संरक्षित ओलितासाठी पाणी देण्याकरिता जिल्ह्यात लोकसहभागातून ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने नदी-नाल्यांच्या पात्रातून पाणी वाहत आहे. वाहते पाणी थांबवून पाण्याची पातळी वाढविणे आणि रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात ५०० प्रमाणे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. महसूल, कृषी, पंचायत व शिक्षण विभागांसह शेतकऱ्यांच्या सहभागातून येत्या २० नोव्हेंबरपासून जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू होणार आहे.
नोडल अधिकारी, नियंत्रण अधिकारी नियुक्त!
जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी (रोहयो) राहुल वानखडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्त पद्धतीने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत.
लोकचळवळ करा; जिल्हाधिकाºयांचे निर्देश!
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यासाठी तहसीलदारांनी महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग व स्वयंसेवी संस्थांना वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून द्यावे. वनराई बंधारे बांधणे ही लोकचळवळ होईल, यासाठी तालुका स्तरावर प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना १६ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिले.