अंगणवाड्या बांधकाम, दुरुस्तीची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:21 PM2020-06-15T12:21:47+5:302020-06-15T12:22:24+5:30
अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील गावांमध्ये अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आॅगस्ट २०१९ मध्येच प्रशासकीय मान्यतेचा आदेश दिल्यानंतरही त्या अंगणवाड्यांची कामे सुरू होण्यास प्रचंड विलंब झाला. अंगणवाडी बांधकाम-२८ तर दुरुस्तीच्या ३८४ पैकी २२३ कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर त्यापैकी दुरुस्तीची ८५ तर १० बांधकामेच पूर्ण झाली आहेत.
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. त्यामुळे बालकांना खासगी किंवा भाड्याच्या इमारतीमध्ये बसावे लागते. त्यातच बालकांना बसण्याची जागा सुरक्षित नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही धोका निर्माण होतो. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला जातो. जिल्हा नियोजन समितीने एप्रिल २०१९ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकासाठी निधी उपलब्ध करून दिला.
प्रत्येक इमारत बांधकामासाठी ८ लाख ५० हजार रुपये मंजूर आहेत. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसारच बांधकाम करण्याचेही बजावले. अंगणवाडी बांधकामासाठी २८ इमारती, तर दुरुस्तीसाठी ३८४ गावांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी देण्यात आला. त्या निधीतून बांधकाम करावयाच्या इमारतींच्या कामांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आॅगस्ट २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार तातडीने कामे सुरू करण्याचेही बजावले. विशेष म्हणजे, त्या आदेशात ३१ मार्च २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे म्हटले आहे. त्यापैकी अनेक कामे अद्यापही सुरूच झालेली नाहीत. प्रशासकीय आदेशानंतर विधानसभा निवडणूक, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता होती. या कचाट्यातून सुटताच कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन झाले. त्यामुळे बांधकाम सुरू करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यापैकी आता १० इमारतींची बांधकामे पूर्ण झाली. दुरुस्तीची ८५ कामे पूर्ण झाल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली. ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे बजावण्यात आले आहे.
या गावांमध्ये होणार अंगणवाडीची इमारत
अंगणवाडीची नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी २८ गावांमध्ये अकोला तालुक्यातील माझोड, रोहणा, दहिहांडा, ताकोडा, बोंदरखेड, यावलखेड, हिंगणा तामसवाडी, सांगवी खुर्द, खेकडी, अंबिकापूर, गोरधा. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बाजार, दातवी, टिपटाळा, माटोडा, बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा, जांभरुण, हातोला, बाळापूर तालुक्यातील स्वरूपखेड, रिधोरा, झुरळ खुर्द, बल्हाडी, तेल्हारा तालुक्यातील खापरखेडा, अकोट तालुक्यातील पाटसूळ, शहानूर, पोपटखेड, पारळा, नेव्होरीचा समावेश आहे.