‘लॉकडाऊन’मध्ये पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:50 AM2020-04-08T10:50:17+5:302020-04-08T10:50:23+5:30
‘लॉकडाऊन’च्या काळात परप्रांतीय मजुरांकडून पोलीस वसाहतीच्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरूच आहे.
- संजय खांडेकर
अकोला : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. अकोल्यातील बांधकाम कंत्राटदाराकडून मात्र ‘लॉकडाऊन’चे राजरोस उल्लंघन होत आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात परप्रांतीय मजुरांकडून पोलीस वसाहतीच्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरूच आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम सुरू असताना कोणत्याच कामगाराच्या नाकातोंडाला सुरक्षेसाठी मास्क किंवा कापड बांधलेले नाही. हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील लोकांकडून होत आहे. दक्षता नगर पोलीस वसाहतीच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन टोलेजंग इमारत उभी झाली आहे. या इमारतीचे बांधकाम काही प्रमाणात शिल्लक राहिलेले असताना सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. परप्रातांतून आलेले मजूर अकोल्यातच अडकले. दरम्यान, या मजुरांच्या निवाºयाची आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे कंत्राटदारावर आलेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सोयीसह इमारतीच्या आतील भागाचे काम सुरूच ठेवले आहे. येथील बांधकाम २१ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ असतानापासून सुरू आहे. इमारतीच्या आतील भागातील छपाईचे काम सुरू असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना कळली. कामगारांचे जत्थे असुरक्षित असून, यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. नाकातोंडाला मास्क किंवा कपडे न बांधताच मजूर समूहाने येथे काम करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा येथे फज्जा उडत आहे. परिसरातील नागरिकांनी ही बाब लोकमत बातमीदारांच्या लक्षात आणून दिली. लोकमतने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता परिसरात आतील भागात काम सुरू असल्याचे दिसून आले. स्थानिक कंत्राटदाराच्या आगाऊपणामुळे गोरगरीब मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा कोरोनासाठी जमावबंदी करीत आहे, तर दुसरीकडे शासकीय इमारतीच्या बांधकामासाठीच मजुरांचा समूह नियमांची पायमल्ली करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या कंत्राटदाराची कानउघाडणी होणे गरजेचे आहे. अन्यथा साथीच्या रोगाने लाखमोलाचा जीव मजूर गमावून बसतील.