महापालिकेचा स्थगनादेश असतानाही गड्डम प्लॉट येथे बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:29 PM2020-02-16T14:29:39+5:302020-02-16T14:29:44+5:30
प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी परिसरात राजरोस अवैध बांधकाम सुरू ठेवले आहे.
अकोला : स्थानिक मौजे ताजनापूर नझूल शीट क्र. ६२ ए भूखंड क्र. ९/४७ च्या गड्डम प्लॉट येथील जागेच्या बांधकामास नगर रचना विभागाचा स्थगनादेश असतानादेखील प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी परिसरात राजरोस अवैध बांधकाम सुरू ठेवले आहे. आता अवैध बांधकामाच्या ठिकाणच्या शेजाऱ्यांनी बांधकाम थांबविण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्यासोबतच न्यायालयात धाव घेतली आहे.
गड्डम प्लॉटच्या उपरोक्त ठिकाणी त्रिवेदी यांनी साईड मार्जिन न सोडता बांधकाम सुरू केले असून, त्याची रितसर परवानगी नगर रचना विभागाकडून घेतली नाही, असा आरोप त्यांच्या शेजाºयांनी केला. या बांधकामामुळे शेजारच्या चुना-मातीच्या भिंतीला तडा जात असल्याने येथील बांधकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांकडे करण्यात आली. तेव्हा महापालिकेच्या नगर रचना विभागाने बांधकामाची शहानिशा करेपर्यंत बांधकाम थांबविण्यासाठी स्थगनादेश दिला, तसेच बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ५२,५३,५४ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा ६ फेब्रुवारी २० च्या आदेशान्वये दिला. या स्थगनादेशानंतर बांधकाम थांबविण्याऐवजी त्रिवेदी यांनी बांधकाम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे येथील शेजारी गौरीशंकर कलशेट्टी आणि गिरीराजराव यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात धाव घेतली आहे. जर न्याय न मिळाला तर याप्रकरणी बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी त्रिवेदी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.