रेल्वे मार्गावर निर्माणाधीन तीन पुलांच्या निविदा उघडणार २९ ला
By admin | Published: February 25, 2016 01:35 AM2016-02-25T01:35:59+5:302016-02-25T01:35:59+5:30
गेज परिवर्तनाच्या दिशेने दक्षिण मध्य रेल्वेचे पाऊल पडते पुढे.
राम देशपांडे / अकोला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनास अद्याप केंद्र व राज्याच्या वन विभागाची परवानगी मिळाली नसली तरी अकोला ते आकोट दरम्यानचे कार्य प्रगतिपथावर आहे. या प्रक्रियेत रेल्वे प्रशासनाला अकोला-आकोट दरम्यान तीन मोठे पूल उभारण्याची गरज भासणार आहे. निर्माणाधीन असलेल्या या तीन पुलांसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ई-निविदा पद्धतीने २८ जानेवारी रोजी प्रस्ताव आमंत्रित केले होते. सोमवार, २९ फेब्रुवारी रोजी ते उघडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनास अद्याप केंद्र व राज्य वन विभागाची परवानगी मिळाली नसली तरी अकोला ते आकोट दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन करण्यास दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. जमीन अधिग्रहणापोटी २९ कोटी महसूल विभागास दिल्यानंतर, या प्रकल्पासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुरेसा निधी मंजूर होणारच, या आशेवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने २८ जानेवारी २0१६ रोजी ई-निविदा पद्धतीने अकोला ते आकोट दरम्यान रेल्वे मार्गावर निर्माणाधीन असलेल्या तीन मोठय़ा पुलांसाठी प्रस्ताव मागविले. २0 कोटी ८३ लाख ५९ हजारांच्या या कामासाठी सिकंदराबाद, बंगळुरु व इतर ठिकाणच्या बांधकाम कंपन्यांनी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनास ई-निविदेद्वारे प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव सोमवार, २९ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली. अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी खा. संजय धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे साकडे घातले तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी वन विभागानेसुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पावले उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय वनअधिकार्यांकडे व्यक्त केली.