एचडीएफसी बँकेला ग्राहक मंचाचा दणका; गहाणातील मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:10 PM2019-02-01T14:10:15+5:302019-02-01T14:11:02+5:30
अकोला: एचडीएफसी बँकेकडे मालमत्ता गहाण देऊन त्या मोबदल्यात अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी घेतलेले कर्ज पूर्णत: परतफेड केल्यानंतरही सदर गहाण असलेली मालमत्ता मुक्त करून न देता त्यांच्याकडून आणखी रक्कम हडप करणाऱ्या एचडीएफसी बँकेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.
अकोला: एचडीएफसी बँकेकडे मालमत्ता गहाण देऊन त्या मोबदल्यात अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी घेतलेले कर्ज पूर्णत: परतफेड केल्यानंतरही सदर गहाण असलेली मालमत्ता मुक्त करून न देता त्यांच्याकडून आणखी रक्कम हडप करणाऱ्या एचडीएफसी बँकेलाग्राहक मंचाने दणका दिला आहे. अशोकराव पोहरे यांची गहाण मालमत्ता तातडीने मुक्त करून त्यांना नुकसान भरपाईही देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
जठारपेठेतील रहिवासी अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी त्यांची मालमत्ता गहाण देऊन एचडीएफसी बँकेच्या अकोला शाखेतून कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज परतफेडीसाठी १२० हप्त्यांची मुदत त्यांना देण्यात आली होती. त्यानुसार पोहरे यांनी सदरचे कर्ज नियमित परतफेड करून १२० हप्त्यात रक्कम भरली होती; मात्र त्यानंतर बँकेने पोहरे यांची त्यांच्याकडे गहाण असलेली मालमत्ता गहाणमधून मुक्त करून देण्यास टाळाटाळ करीत आणखी ३९ हप्त्यात परतफेड करीत पैसे भरण्यास सांगितले. यामधील काही रक्कम भरल्यानंतरही बँकेने त्यांची मालमत्ता मुक्त करून न देता उलट सदरची मालमत्ता जाहीर लिलावामध्ये विक्री करण्याची धमकी पोहरेंना दिली. त्यामुळे अशोकराव पोहरे आणि राहुल पोहरे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. एचडीएफसीच्या मुंबई व अकोला कार्यालयाविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरण दाखल केले. ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोहरे यांनी १२० हप्त्यात रक्कम भरली असून, यापेक्षा अधिक रक्कम वसुली करण्याचे अधिकार बँकेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच बँकेने पोहरे यांची गहाण मालमत्ता तातडीने मुक्त करण्याचा आदेश देऊन नुकसान भरपाईपोटी ८ हजार रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला. या प्रकरणी अशोकराव पोहरे यांच्यावतीने अॅड. मो. परवेज दोकाडिया व अॅड. परेश सोलंकी यांनी कामकाज पाहिले.