बिल्डर घनश्याम कोठारीला ग्राहक मंचाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:50 PM2018-12-23T13:50:12+5:302018-12-23T13:50:19+5:30

एका ग्राहकास तब्बल १७९ चौरस फूट क्षेत्रफळ कमी देऊन त्यांची तब्बल ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बिल्डरला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

 Consumer Forum's penalty to Builder | बिल्डर घनश्याम कोठारीला ग्राहक मंचाचा दणका

बिल्डर घनश्याम कोठारीला ग्राहक मंचाचा दणका

Next

अकोला: विद्या नगरातील रहिवासी तथा बिल्डर घनश्याम किशोर कोठारी यांनी मलकापूर परिसरातील यमुना नगरमध्ये निर्माण केलेल्या डुप्लेक्समध्ये एका ग्राहकास तब्बल १७९ चौरस फूट क्षेत्रफळ कमी देऊन त्यांची तब्बल ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बिल्डरला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी सदरची रक्कम ग्राहकास ४५ दिवसांच्या आतमध्ये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला असून, ग्राहकाला झालेल्या मनस्तापामुळे आणखी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचाही आदेश आहे.
आदर्श कॉलनी येथील रहिवासी संतोष सदाशिव राऊत आणि त्यांची पत्नी माधुरी संतोष राऊत यांनी बिल्डर घनश्याम किशोर कोठारी यांच्या यमुना नगरमधील ८३ डुप्लेक्सची स्किम बघितली. यामधील डुप्लेक्स त्यांना पसंत पडल्यानंतर त्यांनी बिल्डर कोठारी यांची भेट घेऊन खरेदी-विक्री संदर्भात विचारणा केली असता बांधकाम क्षेत्रफळ १ हजार चौरस फूट आणि प्लॉटचे क्षेत्रफळ ६०० चौरस फूट सांगितले होते. यामध्ये बांधकाम व प्लॉट असे मिळून २ हजार २०० रुपये चौरस फुटाने व्यवहार ठरला. यामध्ये वीज कनेक्शन, पाणी आणि डुप्लेक्सची किंमत एकून २३ लाख ५९ हजार रुपये ठरले होते; मात्र खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असता यामध्ये ६०० चौरस फुटाऐवजी ५९४ चौरस फूट आणि बांधकाम ८२१ चौरस फूट दाखविण्यात आले. यावरून बिल्डर कोठारीने तब्बल १७९ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ कमी देऊन संतोष राऊत यांची फसवणूक केली. या १७९ चौरस फुटाचे क्षेत्रफळाची ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांची रक्कम बिल्डर कोठारीने जास्त घेतल्यामुळे राऊत यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार करून ग्राहक मंचामध्ये धाव घेतली. ग्राहक मंचाने बिल्डर कोठारी यांना दणका देत ३ लाख ९३ हजार ८०० रुपये व त्यावरील २०१६ पासूनचे व्याज ४५ दिवसांच्या आतमध्ये अदा करण्याचा आदेश दिला आहे. यासोबतच मेंटनन्ससाठी घेतलेली ५० हजार रुपयांची रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न केल्यामुळे ती रक्कम आणि त्यावरील व्याजही देण्याचा आदेश दिला आहे. तर तक्रारकर्ते संतोष राऊत यांना झालेला मानसिक व शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही ग्राहक मंचाने दिला आहे.

 

Web Title:  Consumer Forum's penalty to Builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.