अकोला मनपा कर्मचा-यांचा संप मिटला
By admin | Published: January 29, 2015 01:19 AM2015-01-29T01:19:43+5:302015-01-29T01:21:03+5:30
शिवसेनेची शिष्टाई; पूर्ण वेतन न मिळाल्यास पुन्हा काम बंद करण्याचा कर्मचा-यांचा इशारा.
अकोला: महापालिका कर्मचार्यांचे सहा दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले. आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि शिवसेनेच्या शिष्टाईनंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत कर्मचारी संघटनेने आंदोलन स्थगित केले असले तरी वेतनाची पूर्ण रक्कम न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला दिला आहे. सहा महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. संघर्ष समितीने प्रशासनाला ४५ दिवसांपूर्वी आंदोलनाची नोटीस दिल्यानंतरही प्रशासनासह सत्ताधार्यांनी या कालावधीत समेट न घडवल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट होती. मनपाच्या तिजोरीत २१ कोटी रुपये जमा असताना जमा रकमेबाबत पालकमंत्र्यांसह प्रभारी आयुक्तांची लेखा विभागाकडून दिशाभूल करण्यात आली. तिजोरीत अवघे १६ कोटी रुपये असल्याने कर्मचार्यांना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याची भूमिका प्रभारी आयुक्तांसह पदाधिकार्यांनी घेतली होती. अखेर संपाच्या सहाव्या दिवशी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत प्रशासन व कर्मचार्यांमध्ये शिष्टाई घडवून आणली. प्रभारी आयुक्त दिवेकर यांच्या दालनात बाजोरिया यांनी २१ कोटींतून कर्मचार्यांचे तीन महिन्यांचे वेतन, सेवानवृत्ती वेतनासह पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करणे प्रशासनाला शक्य असल्याचे सुचित केले. आमदारांच्या प्रस्तावाला प्रभारी आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर संघर्ष समितीने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
**अकोला मनपा शिक्षकांचे आंदोलन मात्र सुरूच
सहा महिन्यांचे वेतन थकीत असताना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत मनपा शिक्षकांनी आंदोलन कायम ठेवत असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. मनपा कर्मचार्यांच्या संपावर तोडगा निघाला असला, तरी आगामी दिवसात शिक्षकांच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे संकेत आहेत.