दहिहांडा येथे दूषित पाणीपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:25+5:302020-12-17T04:44:25+5:30
दहीहांडा : गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हला गळती लागल्यामुळे घाण पाणी ...
दहीहांडा : गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हला गळती लागल्यामुळे घाण पाणी जलवाहितीत जात असल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दहीहांडा गावातील लोकसंख्या जवळपास १४ हजार आहे. गावात नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनाच्या व्हॉल्व्हला गत दीड महिन्यापासून गळती लागली असल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर डबके साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत ग्रामपंचायत सचिवांना वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र समस्या जैसे थे आहे. ३ नोव्हेंबर रोजी याबाबत वृत्त प्रकाशित होताच ग्रामसचिवांनी तत्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह दुरुस्ती न केल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)