राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:30 PM2019-07-08T14:30:24+5:302019-07-08T14:30:33+5:30
अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे
अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या नवीन वेतनश्रेणीनुसार राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस कंत्राटी डॉक्टरांची पदभरती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गत अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत राज्यातील सर्वच कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाºया बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग-अ) मानधनात वाढ केली आहे; मात्र त्यामध्ये बीएएमएस डॉक्टरांच्या उल्लेख नव्हता. यानंतर बीएएमएस डॉक्टरांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. शिवाय, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यास अनेकांचा नकारही वाढत होता. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर पद भरती करण्यात येणार असून, त्यांना वाढीव मानधन दिले जाणार आहे.
सध्याचे मानधन फक्त १५ हजार रुपये
दुर्गम आदिवासी काम करायला एमबीबीएस डॉक्टर तयार होत नसल्याने त्यांच्या जागी सध्या बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. दोघांच्याही कामाचे स्वरूप सारखेच आहे; मात्र बीएएमएस डॉक्टरांना केवळ १५ ते १६ हजार रुपये मानधनावर रुग्ण सेवा द्यावी लागत आहे. नवीन निर्णयानुसार, बीएएमएस डॉक्टरांना आता ४० ते ४५ हजार रुपये एवढे वाढीव मानधन मिळणार आहे.
तर बीएएमएस डॉक्टरांवर टांगती तलवार
दुर्गम भागात बीएएमएस डॉक्टरांची पदभरती केल्यावर त्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर मिळाल्यास, येथील बीएएमएस डॉक्टरांची नोकरी धोक्यात येऊ शकते; परंतु एमबीबीएस डॉक्टरांचा रुग्णसेवा देण्यास नकार असल्याने हा प्रकार क्वचितच घडण्यासारखा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शासन निर्णयानुसार, कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना वाढीव मानधन मिळणार असून, लवकरच त्यांची नव्याने पदभरती केली जाणार आहे. विभागात २५ ते ३० टक्के पद रिक्त आहेत. या निर्णयामुळे बहुतांश दुर्गम भागात २४ तास एक डॉक्टरची उपलब्धता राहणार आहे, हे विशेष.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला