कंत्राटदार म्हणाला, माफ करा! रस्त्याचे काम पुन्हा करतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:16 AM2017-11-28T02:16:23+5:302017-11-28T02:29:06+5:30
अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदाराने कबूल केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या गांधी रोडच्या दुरुस् तीवर करण्यात आलेली २ कोटी ६५ लाखांची तरतूद पाण्यात गेली आहे. अवघ्या चौथ्याच दिवशी गांधी रोडचे काम निकृष्ट व दर्जाहीन झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची चूक गोल्डी ओबेरॉय नामक कंत्राटदाराने कबूल केली. तसेच रस् त्याची पुन्हा दुरुस्ती करून देतो, असे सांगत ‘ब्लॅकलिस्ट’न करण्याची विनंती केल्याचा प्रकार सोमवारी भररस्त्यात पहावयास मिळाला.
अकोला शहरातील सर्वात प्रमुख व मुख्य बाजारपेठेतून जाणार्या मदनलाल धिंग्रा चौक ते गांधी रोड ते थेट राजेश्वर मंदिरपर्यंत डांबरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २२ नोव्हेंबर रोजी रात्री सुरू करण्यात आले. रस्ता दुरुस्तीसाठी २ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. कंत्राटदाराने निविदेनुसार ‘बीएम, कारपेट आणि सिलकोट’ या प्रमाणे ७६ एमएम जाडीचा रस्ता तयार करणे अपेक्षित होते. २२ नोव्हेंबरच्या रात्री सुरू करण्यात आलेले काम २६ नोव्हेंबरपर्यंत आटोपण्यात आले. कंत्राटदाराने सर्व निकष नियम पायदळी तुडवत रस्त्याचे काम दर्जाहीन केल्याचे चित्र समोर येताच शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नि तीन देशमुख, मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी आक्रमक भूमिका घेत रस् त्याची पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौव्हान, कंत्राटदार गोल्डी ओबेरॉय यांना पाचारण करून, गांधी रोडपासून ते सिटी को तवाली व इतर ठिकाणच्या कामकाजाची पाहणी केली असता, रस्त्याचे काम निकृष्ट केल्याचे समोर आले.
यावेळी आ. बाजोरियांनी कंत्राटदार व अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कंत्राटदाराने सुद्धा चूक मान्य करीत रस्त्याचे काम पुन्हा करून देतो, असे सांगत कारवाई न करण्याची विनंती केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रस्त्याची साफसफाई नाहीच!
रस्त्यावर डांबर टाकण्यापूर्वी रस्त्याची साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. काही ठिकाणी थातूरमातूर झाडलोट करण्यात आली. इतर ठिकाणी मात्र मातीवरच डांबराचा शिडकाव करण्यात आला. ‘बीएम’चा थर टाकू न कारपेट व सिलकोट केल्यानंतरही बर्याच ठिकाणी रस्ता उखडल्याचे दिसून येते. रस् त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे ‘पीडब्ल्यूडी’चे संबंधित उप अभियंता काय करीत होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दोन वर्षांची अट कशासाठी?
गांधी रोडचे काम केल्यानंतर रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी दोन वर्षांची अट नमूद आहे. या ठिकाणी कंत्राटदाराने केलेल्या कामाचे अवघ्या चौथ्याच दिवशी पितळ उघडे पडले. सहा-आठ महिन्यांनंतर रस्त्यावर खड्डे पडल्यास ते बुजवण्याची थातूर-मातूर प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने दोन वर्षांची अट नमूद करून ‘पीडब्ल्यूडी’ स्वत:ची पाठ थोपटण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते.
गांधी रोडचे काम अत्यंत दर्जाहीन झाल्याचे समोर आले आहे. शासन निधीची उधळपट्टी अशीच होत असेल, तर शहरातील सर्व निर्माणाधिन रस्त्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी लागेल. हा विषय अधिवेशनात उपस्थित केला जाईल.
- आ. गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना
संबंधित कंत्राटदाराने गांधी रोडचे काम निकृष्ट झाल्याचे मान्य केले आहे. त्याच्याकडून रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करून घेतली जाईल. तसे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कारवाईचा मार्ग खुला आहे.
-मिथिलेश चौव्हान, कार्यकारी अभियंता ‘पीडब्ल्यूडी’