कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: July 9, 2017 09:33 AM2017-07-09T09:33:28+5:302017-07-09T09:33:28+5:30
डुकरे पकडणार्यांना खोलेश्वर भागात जमावाकडून धक्काबुक्की; पोलिसात तक्रार.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्यांना स्थानिक वराह पालकांनी धक्काबुक्की करीत त्यांना जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा प्रकार शनिवारी दुपारी खोलेश्वर परिसरात घडला. याप्रकरणी मनपा प्रशासनाच्यावतीने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार देण्यात आली.
शहरात मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासंदर्भात मनपाच्या सभागृहात ठराव पारित केला. शहरात वराह पालनाचा व्यवसाय करणारे मनपाच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित वराह पालकांनी डुकरांची शहराबाहेर विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा डुकरे पकडण्याची निविदा प्रकाशित केली. वराह पालकांच्या दबावामुळे कोणीही निविदा सादर केली नाही. अखेर एका कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यप्रदेश येथील वीस जणांची चमू आणण्यात आली. शनिवारी सकाळी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये डुकरे पकडण्याची मोहीम सुरू झाली. दुपारी १२ वाजता खोलेश्वर भागात ही मोहीम सुरू असताना खदान, कैलास नगर, बापू नगर आदी भागातून आलेल्या ५0 ते ६0 जणांनी महापालिकेच्या मोहिमेला आडकाठी निर्माण करीत कंत्राटदाराला धक्काबुक्की केली तसेच धारदार शस्त्रे दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे, आरोग्य निरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचार्यांच्या उपस्थितीत घडला, हे विशेष. परिणामी डुकरे पकडण्याची मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, कंत्राटदाराला धक्काबुक्की होत असताना सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन जागेवरून अचानक रफूचक्कर झाले होते.
शहरात १७ हजार डुकरांचा सुळसुळाट
शहरात तब्बल १७ हजारपेक्षा अधिक डुकरांचा सुळसुळाट आहे. एका डुकराचे वजन ४0 ते ५0 किलो होताच त्यांची १00 रुपये किलोप्रमाणे ४ हजार रुपयांत विक्री केली जाते. एका ट्रकमधून किमान १00 डुकरे म्हणजेच चार लाख रुपये किमतीच्या डुकरांची ने-आण केली जाते. एकूणच शहरात एक-दोन नव्हे तर चक्क ६ कोटी रुपये किमतीची डुकरे मुक्तसंचार करीत असल्याचे जाणकारांचे मत आहे. या व्यवसायावर कोणताही खर्च होत नसल्याने वराह पालकांची वर्षभरात लाखो रुपयांची कमाई होते.
नगरसेवकांची अनुपस्थिती खटकली!
मनपाच्या सभागृहात नगरसेवक अजय शर्मा यांनी डुकराचे पिल्लू सोडले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी डुकरे पकडण्याचा ठराव पारित केला होता. खोलेश्वर भागात कंत्राटदाराला धक्काबुक्की व शिवीगाळ होत असताना संबंधित नगरसेवकांची अनुपस्थिती अनेकांना खटकली.