वाद चिघळला; १४ जानेवारीच्या ‘सीएम’ चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:47 PM2019-01-09T12:47:21+5:302019-01-09T12:48:05+5:30
अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे.
अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. ६ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते वसंत देसाई क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेवरून भाजपमधील अंतर्गत मतभेदाची दरी अधिकच रुंदावल्याचे मंगळवारी समोर आले. भाजपच्या पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी भाजयुमोच्या एका प्रमुख पदाधिकाºयाने पाठ फिरविल्याची खमंग चर्चा सुरू होती.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय तालुका स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेता संघ व खेळाडू दुसºया टप्प्यात पार पडणाºया जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत ५ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या धर्तीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चषक स्पर्धेचे उद्घाटन केले होते. यावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा ‘सीएम’ चषक स्पर्धेचे संयोजक डॉ. संजय शर्मा यांनी आक्षेप घेत जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन १४ जानेवारी रोजी होणार असल्याचा दावा केला होता. एकाच स्पर्धेचे दोन वेळा उद्घाटन होणार असल्याने खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे याप्रकरणी ८ जानेवारी रोजी पक्ष कार्यालयात निर्णय घेतला जाणार होता. त्यानुषंगाने मंगळवारी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. किशोर मालोकार, डॉ. बाबूराव शेळके, श्रीकृष्ण मोरखडे, धनंजय गिरधर, गणेश कंडारकर, मंचितराव पोहरे, अनिल गावंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसºया टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन १४ ते १५ जानेवारी रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खेळाडू संभ्रमात!
भाजपमधील अंतर्गत वादात जिल्ह्यातील खेळाडू नाहक भरडल्या जात आहेत. जिल्हास्तरीय सामने ६ व ७ जानेवारी रोजी पार पडल्यानंतर आता पुन्हा १४ व १५ जानेवारी रोजी सामन्यांचे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत नेमक्या कोणत्या सामन्यातील अंतिम विजेता राज्य स्तरासाठी पात्र ठरला जाईल, यावरून खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.