कोंडी फुटली; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा वाजला बिगुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:21+5:302021-09-14T04:23:21+5:30
अकोला : स्थगित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवार, १३ ...
अकोला : स्थगित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवार, १३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार असून, पोटनिवडणुका होत असलेल्या गट आणि गणांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्माण झालेली कोंडी अखेर फुटली असून, पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गत ६ जुलैला पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत ९ जुलै रोजी देण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. पोटनिवडणुका होत असलेल्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या नगण्य असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगामार्फत १३ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ गटांसह सात पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, पोटनिवडणुका होत असलेल्या क्षेत्रात पुनश्च १३ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. स्थगित करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने, यासंदर्भात गत दोन महिन्यांपासून निर्माण झालेली कोंडी अखेर फुटली असून, पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
‘या’ जि.प. गट आणि पं.स. गणांत
होत आहे पोटनिवडणूक !
जिल्हा परिषद गट : दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेड, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगाव, दगडपारवा व शिर्ला.
पंचायत समिती गण : हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, पिंप्री खुर्द, अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपुरी, ब्रह्मी खुर्द, माना, कानडी, दहीहांडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानापूर व आलेगाव.