जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झाले कॉन्व्हेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:56 PM2019-07-22T14:56:19+5:302019-07-22T14:56:26+5:30
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी उमरी केंद्रातील आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद किड्स कॉन्व्हेंट नर्सरी ते केजी टू पर्यंतचे तीन वर्ग सुरू झाले आहेत.
अकोला: इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या भरमसाट शुल्कामुळे गोरगरीब पालकांची इच्छा असूनही त्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलांना शिक्षण देता येत नाही, त्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी उमरी केंद्रातील आठ शाळांमध्ये जिल्हा परिषद किड्स कॉन्व्हेंट नर्सरी ते केजी टू पर्यंतचे तीन वर्ग सुरू झाले आहेत. शहरालगतच या शाळा सुरू झाल्याने पालक-विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.
उमरी केंद्राचे केंद्रप्रमुख मुरलीधर कुलट यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला. जिल्हा परिषद शाळेच्या कॉन्व्हेंटमध्ये कोणतेही प्रवेश शुल्क, मासिक शुल्क नाही. पालकांना विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तके, वह्याच घ्याव्या लागतील. जिल्हा परिषद शाळा उमरी येथील कॉन्व्हेंटचे उद्घाटन नगरसेविका पल्लवी मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी मिलिंद राऊत होते. अतिथी म्हणून अनिल नावकार, डायटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, विस्तार अधिकारी संजय मोरे, विषय शिक्षक जितेंद्र काठोळे, दिनेश बोधनकर, संजय देशमुख, शिवलाल इंगळे उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख कुलट यांनी केले. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विद्या बिरकड यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुरेखा मावळे यांनी मानले. कार्यक्रमाला रेखा म्हैसकर, केंद्रातील मुख्याध्यापक व पालकांची उपस्थिती होती. प्रवेश घेण्यासाठी पालकांनी जिल्हा परिषद शाळा उमरी क्रमांक १ व २ कन्या क्रमांक १ २ व ३, खदान मराठी उर्दू या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.