स्थानिक प्रजातीच्या वृक्षांवर संक्रांत
By admin | Published: December 2, 2015 03:01 AM2015-12-02T03:01:18+5:302015-12-02T03:01:18+5:30
गुलमोहराचे वाढते प्रमाण चिंताजनक!
अकोला: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करताना निरुपयोगी झाडांच्या रो पांची लागवण केली जात आहे. यात गुलमोहरसारख्या विदेशी प्रजातीच्या झाडांचाही समावेश आहे. गुलमोहराचे वाढते प्रमाण स्थानिक हवामानासाठी चिंताजनक बाब असून, यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होण्याची भीतीदेखील पर्यावरणप्रेमी तथा वृक्षसंवर्धनासाठी काम करणार्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. वातावरणानुसार त्या-त्या परिसरात निसर्गाने झाडांच्या विशिष्ट प्रजातींची निर्मिती केली आहे. अशावेळी स्थानिक प्रजातींची जागा इतर वृक्षांनी व्यापली जाते तेव्हा त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होताना दिसतात. वड, पिंपळ, उंबर, चिंच, निंब या वर्हाडातील वृक्षांच्या मूळ प्रजाती आहेत. त्यांच्या जागेवर आता गुलमोहरासारख्या मुळात कमकुवत वृक्षांची लागवड केली जात असून, त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणांवर वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रजातींवर संक्रात येण्याची भीती ११ वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणार्या स्वावलंबी इको क्लबचे समन्वयक हरीश शर्मा यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर हा मुळात मादागास्कर बेटावरील वृक्ष आहे. दिसायला मोहक असलेल्या त्याच्या फुलांना सुगंध नाही. सावलीसाठी कामाचे नसल्याने पक्षीही या झाडाकडे फिरकत नाहीत. जैवविविधता जपण्यात या झाडाचे कोणतेही योगदान नाही. तरीही या वृक्षाची लागवड करण्याकडेच अधिक कल दिसून येतो. त्याऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, निंब या स्थानिक प्रजातींची लागवड अधिक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.