शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

By Admin | Published: December 4, 2014 01:44 AM2014-12-04T01:44:02+5:302014-12-04T01:45:45+5:30

अकोला जिल्ह्यातील १ लाख ११ हजारांवर शेतक-यांना मिळणार लाभ.

Conversion of Farmer's loan to soon | शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

googlenewsNext

संतोष येलकर / अकोला
अल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी लागू करण्यात आलेल्या सवलतींमध्येखरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जांचे रूपांतरण लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना विलंबाने पावसाने हजेरी लावली. त्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाचे उत्पादनही अत्यल्प झाले असून, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करूनही पेरणीचा खर्चही हाती आला नाही. पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने, रब्बी पिकांचेही खरे नाही. पिके हातून गेल्याच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४१ पैसे आहे.
शासन निर्णयानुसार खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ९९७ गावांमध्ये सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, या सवलती जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना १ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांडून काढलेल्या पीक कर्जाचे रूपांतरण लवकरच होणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विविध बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना कर्ज रूपांतरण या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Conversion of Farmer's loan to soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.