विद्यार्थ्यांच्या खिशाला ‘नीट’ कात्री
By admin | Published: June 4, 2016 02:37 AM2016-06-04T02:37:38+5:302016-06-04T02:37:38+5:30
शिकवणी वर्ग, खानावळ, घरभाड्याचे पैसे वाया!
अकोला : मेडिकलला प्रवेश घेऊन इच्छिणार्या अकोल्यासह अन्य जिल्हय़ांतील विद्यार्थ्यांनी हजारो रुपये भरून महिनाभरासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) मार्गदर्शनाचे शिकवणी वर्ग लावले. खानावळसह घरभाडेसुद्धा भरले आणि आता वर्षभरासाठी नीट रद्द करण्याचा केंद्र सरकारचा वटहुकूम निघाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी एमएटी-सीईटीसाठी वर्षभर अभ्यास केला आणि ऐनवेळी ही परीक्षा रद्द करून नीट लागू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी खिन्न झाले. त्यातही विद्यार्थ्यांनी मानसिक तयारी करीत नीटचे आव्हान स्वीकारले. त्यातच न्यायालयात वारंवार केल्या जाणार्या फेरयाचिका व राज्य शासनाकडून दिले जाणारे नुकसान होऊ न देण्याचे आश्वासन यामुळे सीईटी की नीट, या संभ्रमात विद्यार्थी व पालक होते.
तथापि, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हटल्यावर आता नीटच होणार, असे पालक व विद्यार्थ्यांनी गृहीत धरले आणि शहरात पुन्हा महिनाभरासाठी नीटच्या अभ्यासासाठी हजारो रुपये शुल्क भरून शिकवणी वर्ग लावले. खानावळ, घरभाड्याचे पैसेही भरले. विद्यार्थ्यांचे क्लासेसही सुरू झाले; परंतु अवघ्या काही दिवसांतच केंद्र शासनाने वटहुकूम जारी केला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला खरा; परंतु त्याचे त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले.