सहकार विभागाची छापेमारी; ३७ लाखांची रोकड अन् १५० वर धनादेश जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:38 AM2020-01-21T11:38:58+5:302020-01-21T11:39:16+5:30
तीन दिवसात तीन व्यापाºयांवर छापेमारी केल्यानंतर यामधील एका व्यापाºयाच्या कार्यालय व घरातून २९ लाखांची रोकड आणि ८० धनादेश जप्त केले.
अकोला : शहरातील दोन बड्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा व्यवहार सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री छापेमारी केली. छापेमारीनंतर शनिवार, रविवार आणि सोमवारी दुपारी १ वाजता हे धाडसत्र संपले असून, या दोन व्यापाऱ्यांकडून तब्बल ३७ लाखांची रोकड आणि १५० पेक्षा अधिक धनादेश जप्त केले. यासोबतच व्याजाने पैसे वाटप केल्याच्या चिठ्ठ्याही (हुंडी चिठ्ठी) सहकार विभागाच्या अधिकाºयांनी जप्त केल्या; मात्र व्यापाºयांची नावे दडविण्यासाठी सहकार विभाग आटापिटा करीत असल्याने आता या कारवाईवरच संशय निर्माण होत आहे.
टिळक रोडवरील एका मोठ्या बँकेसमोरील हुंडी चिठ्ठी दलाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच राम नगरातील एका आलिशान बंगल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या तब्बल १२ जणांच्या पथकाने अवैध सावकारीच्या तक्रारीनंतर छापेमारी केली. त्यानंतर आणखी एका व्यापाºयाच्या ठिकाणावर सहकारी विभागाने छापा टाकला. तीन दिवसात तीन व्यापाºयांवर छापेमारी केल्यानंतर यामधील एका व्यापाºयाच्या कार्यालय व घरातून २९ लाखांची रोकड आणि ८० धनादेश जप्त केले. त्यानंतर दुसºयाच्या व्यापाºयाकडून ८ लाखांची रोकड आणि ८३ धनादेश जप्त केले. या दोन्ही ठिकाणावरून चिठ्ठ्याही मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आल्या; मात्र सदर व्यापाºयांची नावे बड्या हस्तींची असल्याने त्यांना वाचविण्याचा आटापिटा सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्येक कारवाईचे प्रसिद्धी पत्रक देणाºया सहकार विभागाने आता मात्र न्यायालयाचे नाव समोर करून नावे देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तो नगरसेवक कोण?
सहकार विभागाच्या तब्बल १२ पेक्षा अधिक कर्मचारी व अधिकाºयांनी शनिवारी रात्री धाडसत्र राबविले. या धाडसत्रानंतर एका नगरसेवकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते; मात्र सदर नगरसेवकाने या धाडसत्राच्या वेळी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठ अधिकाºयांसोबत बोलणी करून दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे हा नगरसेवक कोण, याची चर्चा आहे.
१२ नावांची चर्चा जोरात
या अवैध सावकारीच्या प्रकरणात सहकार विभागाने छापेमारी केल्यानंतर तब्बल १२ जणांचे कोट्यवधींचे व्यवहार असल्याच्या चिठ्ठ्या मिळाल्याची माहिती आहे; मात्र केवळ दोघांवर थातूरमातूर कारवाई करण्याचा देखावा करीत हे प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पोलीस अधीक्षकांच्या धाकापोटी सदर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून पूर्ण फिल्डिंग लावण्यात आल्याचीही चर्चा आहे.