शासकीय रुग्णालयांमध्ये लवकरच ‘सीओपीडी’ विशेष केंद्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:13 PM2019-08-03T14:13:55+5:302019-08-03T14:14:17+5:30
राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार आणि अस्थमा यावर उपचार करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन्यात येणार असल्याची माहिती आहे.
अकोला : श्वसनासंबंधित आजारांवर निदान आणि उपचार होत नाहीत; परंतु या आजारांचे वेळीच निदान आणि उपचार व्हावे, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार आणि अस्थमा यावर उपचार करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी राज्य शासनाने पुण्यातील चेस्ट रिसर्च फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतात जवळपास ५५ दशलक्ष लोकांना क्रोनिक आॅबस्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डीसीस (सीओपीडी) म्हणजे श्वसनासंबंधीत आजार आहेत. या आजारांमुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यामध्ये प्रामुख्याने सतत खोकला येणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, श्वास घेताना त्रास होणे यासारखे सामान्य लक्षणे दिसून येतात; परंतु राज्यातील काही शासकीय रुग्णालये वगळता बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारांवर स्वतंत्र उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. श्वसनासंबंधीत आजारांवर रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्येच संपूर्ण उपचार मिळावा, या उद्देशाने राज्यभरात ‘सीपीओडी’चे विशेष केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी राज्य शासनाने पुण्यातील चेस्ट रिसर्च फाउंडेशनसोबतच करार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात टप्प्याटप्प्याने शासकीय रुग्णालयात सीओपीडी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
आजाराचे निदान होते, मात्र उपचार नाही!
राज्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये श्वसनासंबंधी आजार तसेच अस्थमाचे निदान तर होते; मात्र त्यावर योग्य उपचार होत नसल्याचे वास्तव आहे; मात्र शासनाच्या पुढाकाराने शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांना योग्य वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
विदर्भात असणार तीन केंद्र
राज्यात काही शासकीय रुग्णालयांमध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे; मात्र त्यांना अधिक मजबूत करणे गरजेचे असून, या अंतर्गत विदर्भात तीन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
श्वसनासंबंधित आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये सीओपीडीच्या रुग्णांवर उपचार केला जातो.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.